२००८ नंतर एकदम २०१० ला वासोटा ट्रेक ठरला. बरेच मित्र माझ्या मागे लागले होते या ट्रेकसाठी. सगळ्यानी पुर्वी मला इथे भरपूर प्राणी दिसलेल्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि काहींनी स्वता अनुभव ही घेतलेला होता. अशा सगळ्याना फोन करून ट्रेकची माहिती दिली पण नेहमीप्रमाणे बरेच जण गळाले आणि फक्त ५ जण तयार झालो. ही संख्या ही माझ्या साठी जास्तच होती.
यावेळी मी, सागर (२ वेळा वासोटा, २ वेळा दाजीपुर), योगेश (१ वेळ वासोटा, १ वेळ दाजीपुर) आणि २ चेतन (त्यांचा हा पहिलाच ट्रेक ) असे पाच जण होतो.
मी आणि सागर पुण्यातून निघणार होतो आणि बाकी तिघे शिंदेवाडी (भोरफाटा ) इथून गाडी मध्ये बसणार होते.
रात्री ९:३० ला स्वारगेट वरुन रत्नागिरी गाडी पकडली आणि प्रवास सुरू झाला. वाहकाला सांगून ठेवले की शिंदेवाडी वरुन ३ जण चिपळूण साठी बसणारा आहेत तेंव्हा कृपया तिथे गाडी थांबवावी . त्याने ही तशी कबुली देऊन चालकाला सांगून ठेवले. मी दर ५-१० मी. ने त्याना फोन करून गाडी कुठे पोहोचली हे सांगत होतो. ते वेळेमध्ये तिथे पोहोचावेत हीच अपेक्षा होती. पण शेवटी गाडी शिंदेवाडीला पोहोचली पण हे तिघे पोहोचले नव्हते.. माझे डोके फिरले फोन करून शिव्या सुरू झाल्या ... तेवढ्यात पळत हे लोक येताना दिसले .. जवळ आल्यावर ही शिव्या देऊन घेतल्या आणि गाडीमध्ये बसलो ... गाडी लगेचच शिरवळला येऊन थांबली. गाडी आता इथे २० मी. जेवणासाठी थांबणार होती. त्या ब्रेकमध्ये नवीन मेंबरची ओळख करून झाली.
सगळ्यांची जेवणे उरकून गाडीने शिरवळ सोडले आणि पहाटे ४ ला गाडी चिपळूणला पोहोचली. चोरवणेला जायला गाडी आता एकदम ६:३० ला होती. आमच्या कडे बराच वेळ होता. सगळ्यानी पोटे साफ करून घेतली, चहा मारला पण तरीही भरपूर वेळ शिल्लक होताच. मी माझी स्लीपिंग बॅग काढली आणि स्टेशनच्या बाकड्यावर आडवा झालो. योग्याने ही चादर काढून खाली पसरली आणि सगळे त्याच्यावर आडवे झाले. थोडा वेळ पडलो पण झोप काही लागली नाही. ६:१५ ला सगळे समान आवरले आणि चोरवणे गाडी शोधायला एक एकाला पिटाळले. ६:३० ला गाडी लागली आणि आम्ही पटकन जागा पकडल्या. गाडी ने रस्ता धरला. मला उगाच मस्त वाटायला लागले. वासोटा दिसणार, नागेश्वर ला जाणार आज असे काही तरी मनात येत होते.. आता निघालोच होतो तिकडे म्हणाल्या वर काय... पण तरीही हे असे नेहमीच होते माझे.
पहाटेचे मस्त धुके होते.. गार वारा लागत होता.. खिडक्या उघडण्याची ही हिंमत होत नव्हती इतकी थंडी वाजत होती. वळणदार रस्ते, दगड गोट्या नि भरलेले रस्ते तुडवत गाडी सुटली होती.
थोडे धुके कमी झाल्यावर आजूबाजूला न्याहाळणे चालू झाले, वासोटा दिसतोय का ते शोधू लागलो. काही वेळातच समोर प्रचंड वासोटा दिसला. शेजारीच जुना वासोटा उभा होता. ... नागेश्वरचा सूळका अजुन धुक्या मध्येच होता.. थोडावेळाने त्याने ही दर्शन दिले.... वाह.... मस्तच.... नवीन पोरांना हे दाखवून झाले...
चोरवण्यामध्ये उतरून चहा बिस्किटे मारली आणि समोरच शिवाजी महाराजांचा बसलेला पुतळा ठेवला होता. त्याला नमस्कार करून आम्ही मोहिम सुरू केली. चोरवण्यामधून निघून नागेश्वरच्या पहिल्याच चढाने आमचा जीव काढला.
जाम दम लागला. पाय नुसते पुढे उचलून टाकायचे एवढेच काय ते शरीराला काळात होते. अर्ध्या तासा पुर्वी थंडी ने गारठलेले शरीर घामाने पूर्ण भिजून गेले होते.
पुढे सपाट रस्ता लागला आणि चालण्याचा वेग वाढवला. ओढ्यापाशी बसून नाश्ता करायचे ठरले. मस्तपैकी ब्रेड जॅम सौस् खाल्ले. बाटल्यामध्ये पाणी भरून घेतले कारण आता पुढे पाणी मिळण्याची शक्यता कमी होती. इथून पुढचा रस्ता पायारयाचा आहे.. पायारया चढताना तर अजुनच त्रास जाणवतो. हळू हळु चालू लागलो ... तेवढ्यात डाव्या बाजूच्या डोंगरा वरुन भेकरचा भेदरलेला आवाज येऊ लागला..आम्ही दरीच्या जवळ असल्याने आवाज खूप मोठा येत होता आणि घुमत ही होता. बराच वेळ दरी न्याहळली पण काहीही दिसले नाही... थोडे पुढे जाऊन परत शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. आता आवाज ऐकत ऐकतच पुढे चालू लागलो. डोंगरमाथ्या वरुन जाणार्या वाटे वर होतो. उजव्या बाजूला वासोटा आणि त्याच्या पलीकडे जुना वासोटा दिसत होते. त्या प्रचंड डोंगरावर पावसाने धबधब्याच्या रूपाने मारलेल्या रेघोट्या ही दिसत होत्या. मधूनच एखादा ढग खाली येऊन वासोट्याच्या खांद्यापासून त्याला चिटकून हळुहळु वर वर सरकत जात होता. सगळेजण शांतपणे इकडे तिकडे पाहत बसले होते. तेवढ्यात चोरवण्या पासून वर येणार्या डोंगरा वरुन डरकाळी सारखे आवाज येऊ लागले . नीट ऐकल्यावर तो बिबट्या असावा असा अंदाज येत होता. बराच वेळ त्याचे ओरडणे चालू होते.
तो काय करत असेल? कसा बसला असेल? का ओरडत असेल ? समोर आला तर बरे होईल? अशी बरीच चर्चा सगळे जण करत होतो. पण तसे काही झाले नाही आणि आम्ही पुढचा रस्ता धरला
आता थोडा झाडीचा मार्ग संपून पूर्ण मोकळा, उघडा बोडका कडेकपारीचा मार्ग सुरू झाला होता. याच कडेकपारी मध्ये २-३ ठिकाणी पालीने कपारीला चिटकवलेलि २-२ अंडी दिसली. जवळ असलेले पाणी संपत आले होते. वाटेमध्ये कुठे ही पाणी नाही त्यामुळे नागेश्वरला पटकन पोहोचणे चांगले असे ठरवून पटपट चालू लागलो. नाही म्हणायला एक दोन ठिकाणी दगडावर ओलावा दिसला पण तो काय कामाचा.
आता एकदम कपारीला लागून चढण होती. मी, चेतन बोडके, सागर, दुसरा चेतन आणि शेवटी योग्या असे चाललो होतो... मी आणि चेतन जरा पुढे झालो. आमच्या आणि त्या तिघामध्ये थोडे अंतर पडले. एकदम मोठमोठे दगड खाली कोसळु लागले. त्या शांततेमध्ये दगडांचे आवाज जोरजोरात ऐकू येऊ लागले. ३-४ दगड आमच्या समोरून खाली दरी मध्ये पडले.. आम्ही वर पहिले तर अजुन दगड येऊ लागले. आम्ही पटकन कपारीचा आश्रय घेतला आणि मागच्या ना तिथेच थांबायला सांगितले. ५-६ किलो चे दगड जबरदस्त वेगाने अंगावर येत होते. दगड येणे थांबले तसा मी बाहेर जाऊन कोण दगडी पडत आहे ते पाहु लागलो. वरच्या बाजूला लाल तोंडच्या माकडांची एक टोळी हे उद्योग करत होती. चालता चालता सहज ते दगड आमच्या कडे सोडत होते. आता ते हे जाणून बुजून करत होते का चुकुन होत होते माहीत नाही पण त्यांचे नेम अगदी आमच्या वरच असल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात दगडांचा पुढचा लोट त्यानी आमच्या दिशेने सोडला.. अगदी म्हणजे अगदी ५फुट चेतन च्या डोक्या वरुन एक मोठा दगड झाडावर जाऊन आदळला. आता आम्ही जोरजोरात ओरडून त्याना पळवून लावण्याचा प्रयत्न करत होतो.. हळु हळु टोळी पुढे सरकली आणि दगड खाली येणे बंद झाले. त्या तिघाना पुढे येण्याची खूण केली. इथेच आमचेकडे असणारे पाणी संपले.
पुन्हा चढायला सुरुवात केली आणि एकदाचे २:३० ला नागेश्वर ला पोहोचलो.
कुंडावर जाऊन पाणी भरून आणले आणि आता कॉफीचा बेत ठरला. कॉफी आणि बिस्किटे पोटात गेल्यावर जरा बरे वाटू लागले.
थोडा आराम करून कुंडापासून खाली फिरायला जायचा प्लान ठरला. पण आराम एवढा वाढला की पोरं उठायला ७ वाजले.
मी ६:३० ला उठून गुहेबाहेर जाऊन समोर दिसणारे डोंगर न्याहाळु लागलो. खाली दरीमधून शेकरूचे आवाज ऐकू येऊ लागले. या भागामध्ये सलग असे जंगल नाही. मध्ये मध्ये गवताळ भाग आहेत आणि याच भागामध्ये मला बराच वेळा गवे चारताना दिसले आहेत त्यामुळे असे भाग जरा नीट न्यहाळत होतो. जास्त शोधावे लागले नाही. अशाच एका गवताळ पट्ट्या मध्ये एक गवा मादी आणि जवळ जवळ एक वर्षे तिचे पिल्लू चरताना दिसले. आई पुढे आणि पाठीमागे पिल्लू असे ते चरत होते. थोडाथोड्या वेळने आई चरणे थांबवून इकडे तिकडे पाहायची आणि पुन्हा खाणे चालू करायची. आई आणि पिल्लाने झाडी मध्ये प्रवेश केला आणि ते दिसेनासे झाले. मी सुद्धा उठून गुहेचा रस्ता धरला. अजुन कोणीही उठले नव्हते. जेवण करून लगेच झोपायचे ठरले कारण उद्या बरीच मोठी मजल मारायची होती.
सगळ्याना उठवून खिचडीची तयारी केली. १० ला खिचडी तयार झाली. चटणी, खिचडी, लोणचे असा मस्त बेत झाला.
हवे हवेसे वाटणारे गार वारे वाहत होते. अजिबात ढग नव्हते त्यामुळे चांदण्या स्वच्छ दिसत होत्या.
गुहेमध्ये पडल्यावर गुहेच्या आकाराचे अंडाकृती आकाश आपल्याला दिसते. तेवढ्या मधून दिसणार्या चांदण्या ही डोळ्याना सुखावत होत्या.
रात्री च्या शांततेत पिंडी वर पडणार्या पाण्याच्या थेंबाचा आवाज मस्त संगीता सारखा वाटत होता. आजूबाजूला ही पाणी ठिबकत वेगळेच संगीत तयार करत होते. पथार्या टाकून पडल्यावर टॉर्च गुहेच्या छतावर मारला. नेहमी दिसणार्या मोठ्या पाली तिथेच होत्या. छताच्या एका बिळामध्ये वाटवाघुळाच्या जोडीने पिल्ले दिली होती. त्याना खायला घालायला त्यांची लगबग उडाली होती. दर २-३ मी. एक वटवाघूळ येऊन बिळापाशी जाई आणि काही तरी खायला घालून परत अंधारात गडप होई. आई बापा पैकी कोणीही बिळा जवळ आले की लगेच पिल्ले चिराकायला सुरवात करत. थोडावेळ त्यांचा खेळ पहिला, फोटो काढण्याचा ही प्रयत्न केला. प्रत्येक चिराकण्याला आईबाप एक घास पिलाच्या तोंडात घालून पुढच्या घसाची सोय करायला अंधारात निघून जाई. आता झोप अनावर होऊन मी डोळे झाकले.
सकाळी सगळ्याना लवकर उठवून कॉफी करायला घेतली. सकाळी सकाळी गारवा जाणावत होता. सगळे चुलीच्या आजूबाजूला उभे राहून कॉफी ची वाट पाहु लागले. कॉफी बिस्कीटे आणि रात्रीची खिचडी गरम करून खाऊन घेतली.
आज तर जुना वासोटा सर करायचा होता. रस्ता माहीत नव्हता, वर काय असेल माहीत नव्हते, पण ८-१० वेळा नुसता वासोटा करून गेलो होतो. आणि दरवेळी म्हणायचो नेक्स्ट टाइम जुना वासोटा करायचा म्हणून.. पण यावेळी घरूनच ठरवले होते जुना वासोटा करायचा म्हणून. आज तो दिवस आला , एक मोठी दोरी पण बरोबर घेतली, दुपारी खाण्यासाठी काही पदार्थ घेतले आणि मोहीम सुरू झाली.
वासोट्या चा रस्ता धरला. हा रस्ता जरा दरी च्या कडेकडेने असल्यामुळे थोडे हळू हळू चाललो होतो. २ चेतन पैकी १ चेतन जरा स्थूल असल्याने त्याला जरा सांभाळून पुढे घेत होतो. डाव्या बाजूच्या डोंगरावर लांब एक गवा चारताना दिसला. तुळशी वृंदावन पासून वासोट्याच्या पायथ्यापर्यंत असणाऱ्या झाडी मध्ये मधेच एका ठिकाणी एका वटवाट्या ची अंडी दिसली,तिथे थोडे फोटो session झाले. आम्हाला घरट्या जवळ पाहून घर मालक खूप बोंबाबोंब करू लागले सगळे जंगल त्यांनी डोक्यावर घेतले त्यामुळे तेथून निघण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता काही वेळा मध्ये वासोट्याच्या पायथ्या ला पोहोचलो.
तिथून आता पुढचा रस्ता कोणाला हि माहित नव्हता. त्यामुळे शिवसागर तलाव कडे जाणारा रस्ता धरला. थोडे पुढे गेल्यावर उजवी कडे जुन्या वासोट्या कडे वळलो. रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रानकोंबड्या दिसल्या. पुढे करावीचे रान तुडवत निघालो, पडत पडत पुढे सरकत होतो. पुढे दिसणारी दरी कशी तरी चढून वर मोकळ्या भागात पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो होतो वासोट्याच्या बाबूकड्या कडे असणाऱ्या माचीच्या खाली. सकाळचे १० वाजले होते. समोर जबरदस्त दृश्य होते. जोराचा वर वाहत होता .
२-४ ढग वाऱ्या बरोबर खेळत खेळत जुन्या वासोट्याच्या खांद्यावरून डोक्या वर चढत आकाशात विलीन होत होते. अशा मस्त ठिकाणीच नाश्ता करण्याचे ठरवले. ब्रेड, चिवडा, जॅम, बिस्किटे खाल्ली. बराच वेळ तिथे photography झाली आणि थोडे वाद हि झाले ... माझे आणी सागर चे. पण शेवटी सगळे गोड होऊन आम्ही पटकन जुन्या वासोट्याचा रस्ता धरला. समोर लक्ष्य होते त्यामुळे आधीच ठरवले कोठून जायचे, कोठून वर चढायचे ते . १५ मी. मध्येच अशाठिकाणी पोहोचलो जिथून चढणे खूप अवघड mhanaje दोरी लावूनच जाता येईल असे होते
आता हा उभा खडक पार केला की आम्ही जुन्या वासो ट्या वर पाय ठेवणार होतो. एका बाजूला दरी आणि दुसरी कडे उभा काडा
चेतन : मला जरा आवघड वाटताय इथून चढणे. दुसरी वाट शोधुया.
सागर : अरे काही नाही !! जाउ आपण वरती आहे ना आम्ही सगळे.
मी : मी आधी वर जातो आणि वरुन बघतो एखादी सोपी वाट आहे का ते ?
मी माझ्या बरोबर वीडियो कॅमरा आणि फोटोग्रॉफी कॅमरा घेऊन हळूहळू वर चढू लागलो. ५ मी. मध्ये मी वर चढलो. वाट तेवढी अवघड नव्हती पण चेतनबद्दल शंका होती. त्यामुळे नवीन वाट शोधू लागलो. थोडे पुढे २ खडका मधून वाट असल्यासारखे दिसू लागले. तिथून सगळ्यानी चढावे असे मला वाटले. नीट चढता येत नव्हते त्यामुळे मी आणलेली दोरी काढायला सांगितले. दोरीचे एक टोक मी वर झुडपाच्या बुंध्याला गुंडाळून घेतले आणि त्याचा आधार घेत सगळ्याना वर चढायला सांगितले.
प्रथम जरा स्थूल असणार्या चेतना ला वर घेतले . फरपटत फरपटत तो वर चढून आला. त्याला वर बसवून सागरला वर घेतले, मग दुसरा चेतन आणि शेवटी योगेश. जास्त त्रास योगेशचाच झाला.
त्याच्या उंची मुळे त्याचा हात वर कपारी पर्यंत पोहोचत नव्हता आणि दोर हि तेवढा लांब नव्हता. काही केल्या त्याला वर येत येईना. मग मीच झुडूपाचा दोर सोडून खाली उतरलो. एक टोक माझ्या हातात आणि दुसरे टोक खाली त्याच्या कडे फेकले. त्याने टोक धरून वर चढण्यास सुरुवात केली आणि वर पोहोचला.
आता आम्ही जुन्या वासोट्यावर पाय ठेवला होता. १० वर्षे ज्याची वाट पाहत होतो ती पूर्ण झाली. खांद्या इतकी वाढलेली करावी सगळीकडे पसरलेली होती. जांभूळ, अजनाची झाडी वाकडी तिकडी वाढलीली होती. मोठ मोठी दगडी खडक जिकडे तिकडे विखुरले होते. अगदी शांतपणे आम्ही चालत होतो. कधी आणि कुठून काय बाहेर येईल काहीही कल्पना नव्हती. थोडे पुढे गेल्यावर मोठमोठ्या गुहा, कापऱ्या दिसू लागल्या. काही गुहा तर इतक्या मोठ्या होत्या कि आम्ही सगळेजण अगदी आरामात त्या मध्ये झोपू शकलो असतो.
प्रत्येक जण अगदी सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत होता.
मध्येच एखाद्या गुहेमध्ये शिरून एखाद्या प्राण्याचे केस सापडतात का ते शोधात होतो. पुढे चालता चालता एक मोठा खडक समोर आला. त्याच्या वर सगळे मोकळे असावे असे वाटत होते. आकाश हि दिसत होते त्यामुळे त्याच्यावर चढण्याचा निर्णय घेतला. रस्ता शोधायला सुरुवात केली पण जिकडे तिकडे मोठमोठे कडे कापर्या च फक्त. अशीच एक कपारी शोधून त्याच्यातून वर चढण्याचे ठरवले. मी चढून वर गेलो. वर विस्तीर्ण पठार होते. लांब च लांब गवताळ माळरान.
सगळीकडे नजर फिरवली एखादा प्राणी दिसतोय का ते पहिले पण छे. मग पुन्हा खाली असलेल्या पोरांना वर घेण्यासाठी दोरी धरून उभा राहिलो. सगळे वर आले. आता सगळे मिळून पठार न्याहाळू लागलो. मागे शिवसागर जलाशय दिसत होता. चालत चालत पठाराच्या दुसर्या टोकावर गेलो. खाली दाट जंगल दिसत होते. तिकडे हि खाली उतरण्यासाठी एक मोठा कडा उतरणे गरजेचे होते. दुपारचे ३ वाजले होते पोटा मध्ये कावळे ओरडू लागले होते त्यामुळे जंगला मध्ये उतरण्याचा प्लान रद्द करून एका झाडा खाली बसून पोट पूजा केली. ४ वाजत आले होते. परतीचा प्रवास करायचा होता. त्यामुळे परत जिथून चढलो तिथेच पोहोचलो.
पटपट खाली उतरून परतीच प्रवास सुरु केला. आता लवकर नागेश्वरला पोहोचणे गरजेचे झाले होते कारण जवळचे पाणी संपले होते. जेवणानंतर हि पाणी मिळाले नव्हते. घसे कोरडे झाले होते. गडाच्या दुसर्या टोका वर पोहोचलो. त्या बाजूला एक कडा तुटून मुख्य कड्यापासून १-२ फूट बाजूला तरंगत असल्यासारखा झाला होता. त्याच्या वर उड्या मारून मस्त फोटो काढले ..
समोर वासोटा दिसत होता आणि ४-५ माणसाचे टोळके दिसत होते.. चित्र विचित्र आवाज काढत ते सुधा आमच्या कडे बघत होते. थोडा वेळ तिथे थांबलो.. दरवेळी वासोट्या वरून जो बाबूकडा पाहून प्रसन्न होत होतो त्याच कड्यावर उभे राहून वासोटा न्याहाळत होतो. मस्त वाटत होते. थोडा वेळ थांबून प्रवास पुन्हा सुरु केला. पुन्हा दोरी लावून जिथून चढलो तिथेच पोहोचलो ... पुन्हा दोरी लावून खाली उतरलो ... तिथून खाली उतरल्या उतरल्या वासोट्यावर पण जायचा प्लान ठरला. मग काय पळतच जिथे सकाळी नाश्ता केला तिथे पोहोचलो . आता एक चढ चढून वासोट्यावर पोचलो. तळयावर पोहोचलो. पोटभर पाणी पिले आणि बाबूकड्या च्या बाजूला गेलो. पुन्हा चर्चा सुरु केली कोठून कसे वर चढलो कुठे थांबलो.... वगैरे वगैरे ?
बरेच फोटो काढून घेतले ... थोडा अंधार पडायला लागला होता त्यामुळे नागेश्वरचा रस्ता धरला. उतरताना सागरला खूप त्रास होऊ लागला. ६:३० ला आम्ही नागेश्वर वासोटा आणि शिवसागर रस्ते जिथे मिळतात तिथे होतो .. जंगलामध्ये जाम अंधार दिसू लागला. torch बाहेर काढले आता सागर बरोबर चालणे आवश्यक होते. पूर्ण अंधार पडला. चालताना कोणत्याही झाडावर प्रकाश टाकला तर त्यावर हजारो किडे हलताना दिसायचे. लांब लांब पायाचे ते किडे प्रकाश पडल्या पडल्या इकडे तिकडे पळू लागत . जंगलाच्या बाहेर पडलो आणि नागेश्वरचा सुळका दिसू लागला. पण जरा विचित्र आणि भीती हि वाटू लागली ... पूर्ण गुहा ज्वाला नि भरली होती. तो सुळका पूर्ण पेटला होता. आमचे समान जाळून गेले कि काय, पटपट जाऊन काय झाले पाहावे असे वाटू लागले पण तसे हि करता येईना कारण एका बाजूला दरी आणि एकाबाजूला कारवीचे रान आणि त्यातून एका चेतना ला अशा भागातून अगदी सांभाळून घ्यावे लागत. हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता.. आम्ही चालत होतो काही वेळाने आग सुधा विझून गेली. नागेश्वर ला पोहोचलो तर तिथे एक मुंबई चा गट आला होता आणि त्यांनीच हि आग लावली होती.
त्याच्या शी गप्पा गोष्टी झाल्या. आम्ही जेवण तयार करायला घेतले. पुन्हा एकदा खिचडी केली आणि खावून घेतली. आज जरा गारवा जाणवायला लागला. जेवण झाल्यावर तर हूडहुडी भरण्या इतकी थंडी वाढली. काल नुसत्या बॅनियन वर झोपलो होतो आणि आज २ टी-शर्ट, स्वेटर घालून सुधा थंडी जात नव्हती. बराच वेळ शेकोटीच्या आजूबाजूला बसून होतो. उद्या परतीचा प्रवास करणार होतो. सकाळी सकाळी दुसरा ग्रूप उठून खाली उतरू लागला होता. आम्ही पण सगळे सामान आवरले पण सगळे जण म्हणत होते की कुठेतरी एक तासभर फिरून येऊ. म्हणून मग कुंडाकडून खाली जंगलमध्ये जाण्यासाठी निघालो. पण भरपुर फिरून सुधा काहीही दिसले नाही. आता १० वाजले होते. १०:३० ला चोरवण्या कडे उतरू लागलो. सागर निवांत उतरत होता .
हळूहळू उतरत २ ला आम्ही चोरवणे गावात उतरलो. ४ ला गाडी होती मस्त ओढ्यामध्ये आंघोळी करून घेतल्या. आणि बस स्टॅंड वर पोहोचलो आणि वडापाव खाऊन गाडी ची वाट पाहत बसलो होतो. शेजारीच मुले क्रिकेट खेळात होती त्यांच्या बरोबर थोडा वेळ क्रिकेट खेळून घेतले. गाडी आली आणि आमचा पुण्या कडचा प्रवास सुरू झाला.