Pages

Thursday, May 12, 2011

जुना वासोटा ट्रेक (९-१२ डिसेंबर २०१०)





२००८ नंतर एकदम २०१० ला वासोटा ट्रेक ठरला. बरेच मित्र माझ्या मागे लागले होते या ट्रेकसाठी. सगळ्यानी पुर्वी मला इथे भरपूर प्राणी दिसलेल्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि काहींनी स्वता अनुभव ही घेतलेला होता. अशा सगळ्याना फोन करून ट्रेकची माहिती दिली पण नेहमीप्रमाणे बरेच जण गळाले आणि फक्त ५ जण तयार झालो. ही संख्या ही माझ्या साठी जास्तच होती.
यावेळी मी, सागर (२ वेळा वासोटा, २ वेळा दाजीपुर), योगेश (१ वेळ वासोटा, १ वेळ दाजीपुर) आणि २ चेतन (त्यांचा हा पहिलाच ट्रेक ) असे पाच जण होतो.
मी आणि सागर पुण्यातून निघणार होतो आणि बाकी तिघे शिंदेवाडी (भोरफाटा ) इथून गाडी मध्ये बसणार होते.

रात्री ९:३० ला स्वारगेट वरुन रत्नागिरी गाडी पकडली आणि प्रवास सुरू झाला. वाहकाला सांगून ठेवले की शिंदेवाडी वरुन ३ जण चिपळूण साठी बसणारा आहेत तेंव्हा कृपया तिथे गाडी थांबवावी . त्याने ही तशी कबुली देऊन चालकाला सांगून ठेवले. मी दर ५-१० मी. ने त्याना फोन करून गाडी कुठे पोहोचली हे सांगत होतो. ते वेळेमध्ये तिथे पोहोचावेत हीच अपेक्षा होती. पण शेवटी गाडी शिंदेवाडीला पोहोचली पण हे तिघे पोहोचले नव्हते.. माझे डोके फिरले फोन करून शिव्या सुरू झाल्या ... तेवढ्यात पळत हे लोक येताना दिसले .. जवळ आल्यावर ही शिव्या देऊन घेतल्या आणि गाडीमध्ये बसलो ... गाडी लगेचच शिरवळला येऊन थांबली. गाडी आता इथे २० मी. जेवणासाठी थांबणार होती. त्या ब्रेकमध्ये नवीन मेंबरची ओळख करून झाली.
सगळ्यांची जेवणे उरकून गाडीने शिरवळ सोडले आणि पहाटे ४ ला गाडी चिपळूणला पोहोचली. चोरवणेला जायला गाडी आता एकदम ६:३० ला होती. आमच्या कडे बराच वेळ होता. सगळ्यानी पोटे साफ करून घेतली, चहा मारला पण तरीही भरपूर वेळ शिल्लक होताच. मी माझी स्लीपिंग बॅग काढली आणि स्टेशनच्या बाकड्यावर आडवा झालो. योग्याने ही चादर काढून खाली पसरली आणि सगळे त्याच्यावर आडवे झाले. थोडा वेळ पडलो पण झोप काही लागली नाही. ६:१५ ला सगळे समान आवरले आणि चोरवणे गाडी शोधायला एक एकाला पिटाळले. ६:३० ला गाडी लागली आणि आम्ही पटकन जागा पकडल्या. गाडी ने रस्ता धरला. मला उगाच मस्त वाटायला लागले. वासोटा दिसणार, नागेश्वर ला जाणार आज असे काही तरी मनात येत होते.. आता निघालोच होतो तिकडे म्हणाल्या वर काय... पण तरीही हे असे नेहमीच होते माझे.
पहाटेचे मस्त धुके होते.. गार वारा लागत होता.. खिडक्या उघडण्याची ही हिंमत होत नव्हती इतकी थंडी वाजत होती. वळणदार रस्ते, दगड गोट्या नि भरलेले रस्ते तुडवत गाडी सुटली होती.
थोडे धुके कमी झाल्यावर आजूबाजूला न्याहाळणे चालू झाले, वासोटा दिसतोय का ते शोधू लागलो. काही वेळातच समोर प्रचंड वासोटा दिसला. शेजारीच जुना वासोटा उभा होता. ... नागेश्वरचा सूळका अजुन धुक्या मध्येच होता.. थोडावेळाने त्याने ही दर्शन दिले.... वाह.... मस्तच.... नवीन पोरांना हे दाखवून झाले...
चोरवण्यामध्ये उतरून चहा बिस्किटे मारली आणि समोरच शिवाजी महाराजांचा बसलेला पुतळा ठेवला होता. त्याला नमस्कार करून आम्ही मोहिम सुरू केली. चोरवण्यामधून निघून नागेश्वरच्या पहिल्याच चढाने आमचा जीव काढला.
जाम दम लागला. पाय नुसते पुढे उचलून टाकायचे एवढेच काय ते शरीराला काळात होते. अर्ध्या तासा पुर्वी थंडी ने गारठलेले शरीर घामाने पूर्ण भिजून गेले होते.
पुढे सपाट रस्ता लागला आणि चालण्याचा वेग वाढवला. ओढ्यापाशी बसून नाश्ता करायचे ठरले. मस्तपैकी ब्रेड जॅम सौस् खाल्ले. बाटल्यामध्ये पाणी भरून घेतले कारण आता पुढे पाणी मिळण्याची शक्यता कमी होती. इथून पुढचा रस्ता पायारयाचा आहे.. पायारया चढताना तर अजुनच त्रास जाणवतो. हळू हळु चालू लागलो ... तेवढ्यात डाव्या बाजूच्या डोंगरा वरुन भेकरचा भेदरलेला आवाज येऊ लागला..आम्ही दरीच्या जवळ असल्याने आवाज खूप मोठा येत होता आणि घुमत ही होता. बराच वेळ दरी न्याहळली पण काहीही दिसले नाही... थोडे पुढे जाऊन परत शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. आता आवाज ऐकत ऐकतच पुढे चालू लागलो. डोंगरमाथ्या वरुन जाणार्‍या वाटे वर होतो. उजव्या बाजूला वासोटा आणि त्याच्या पलीकडे जुना वासोटा दिसत होते. त्या प्रचंड डोंगरावर पावसाने धबधब्याच्या रूपाने मारलेल्या रेघोट्या ही दिसत होत्या. मधूनच एखादा ढग खाली येऊन वासोट्याच्या खांद्यापासून त्याला चिटकून हळुहळु वर वर सरकत जात होता. सगळेजण शांतपणे इकडे तिकडे पाहत बसले होते. तेवढ्यात चोरवण्या पासून वर येणार्‍या डोंगरा वरुन डरकाळी सारखे आवाज येऊ लागले . नीट ऐकल्यावर तो बिबट्या असावा असा अंदाज येत होता. बराच वेळ त्याचे ओरडणे चालू होते.
तो काय करत असेल? कसा बसला असेल? का ओरडत असेल ? समोर आला तर बरे होईल? अशी बरीच चर्चा सगळे जण करत होतो. पण तसे काही झाले नाही आणि आम्ही पुढचा रस्ता धरला
आता थोडा झाडीचा मार्ग संपून पूर्ण मोकळा, उघडा बोडका कडेकपारीचा मार्ग सुरू झाला होता. याच कडेकपारी मध्ये २-३ ठिकाणी पालीने कपारीला चिटकवलेलि २-२ अंडी दिसली. जवळ असलेले पाणी संपत आले होते. वाटेमध्ये कुठे ही पाणी नाही त्यामुळे नागेश्वरला पटकन पोहोचणे चांगले असे ठरवून पटपट चालू लागलो. नाही म्हणायला एक दोन ठिकाणी दगडावर ओलावा दिसला पण तो काय कामाचा.
आता एकदम कपारीला लागून चढण होती. मी, चेतन बोडके, सागर, दुसरा चेतन आणि शेवटी योग्या असे चाललो होतो... मी आणि चेतन जरा पुढे झालो. आमच्या आणि त्या तिघामध्ये थोडे अंतर पडले. एकदम मोठमोठे दगड खाली कोसळु लागले. त्या शांततेमध्ये दगडांचे आवाज जोरजोरात ऐकू येऊ लागले. ३-४ दगड आमच्या समोरून खाली दरी मध्ये पडले.. आम्ही वर पहिले तर अजुन दगड येऊ लागले. आम्ही पटकन कपारीचा आश्रय घेतला आणि मागच्या ना तिथेच थांबायला सांगितले. ५-६ किलो चे दगड जबरदस्त वेगाने अंगावर येत होते. दगड येणे थांबले तसा मी बाहेर जाऊन कोण दगडी पडत आहे ते पाहु लागलो. वरच्या बाजूला लाल तोंडच्या माकडांची एक टोळी हे उद्योग करत होती. चालता चालता सहज ते दगड आमच्या कडे सोडत होते. आता ते हे जाणून बुजून करत होते का चुकुन होत होते माहीत नाही पण त्यांचे नेम अगदी आमच्या वरच असल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात दगडांचा पुढचा लोट त्यानी आमच्या दिशेने सोडला.. अगदी म्हणजे अगदी ५फुट चेतन च्या डोक्या वरुन एक मोठा दगड झाडावर जाऊन आदळला. आता आम्ही जोरजोरात ओरडून त्याना पळवून लावण्याचा प्रयत्न करत होतो.. हळु हळु टोळी पुढे सरकली आणि दगड खाली येणे बंद झाले. त्या तिघाना पुढे येण्याची खूण केली. इथेच आमचेकडे असणारे पाणी संपले.
पुन्हा चढायला सुरुवात केली आणि एकदाचे २:३० ला नागेश्वर ला पोहोचलो.

कुंडावर जाऊन पाणी भरून आणले आणि आता कॉफीचा बेत ठरला. कॉफी आणि बिस्किटे पोटात गेल्यावर जरा बरे वाटू लागले.
थोडा आराम करून कुंडापासून खाली फिरायला जायचा प्लान ठरला. पण आराम एवढा वाढला की पोरं उठायला ७ वाजले.
मी ६:३० ला उठून गुहेबाहेर जाऊन समोर दिसणारे डोंगर न्याहाळु लागलो. खाली दरीमधून शेकरूचे आवाज ऐकू येऊ लागले. या भागामध्ये सलग असे जंगल नाही. मध्ये मध्ये गवताळ भाग आहेत आणि याच भागामध्ये मला बराच वेळा गवे चारताना दिसले आहेत त्यामुळे असे भाग जरा नीट न्यहाळत होतो. जास्त शोधावे लागले नाही. अशाच एका गवताळ पट्ट्या मध्ये एक गवा मादी आणि जवळ जवळ एक वर्षे तिचे पिल्लू चरताना दिसले. आई पुढे आणि पाठीमागे पिल्लू असे ते चरत होते. थोडाथोड्या वेळने आई चरणे थांबवून इकडे तिकडे पाहायची आणि पुन्हा खाणे चालू करायची. आई आणि पिल्लाने झाडी मध्ये प्रवेश केला आणि ते दिसेनासे झाले. मी सुद्धा उठून गुहेचा रस्ता धरला. अजुन कोणीही उठले नव्हते. जेवण करून लगेच झोपायचे ठरले कारण उद्या बरीच मोठी मजल मारायची होती.
सगळ्याना उठवून खिचडीची तयारी केली. १० ला खिचडी तयार झाली. चटणी, खिचडी, लोणचे असा मस्त बेत झाला.
हवे हवेसे वाटणारे गार वारे वाहत होते. अजिबात ढग नव्हते त्यामुळे चांदण्या स्वच्छ दिसत होत्या.
गुहेमध्ये पडल्यावर गुहेच्या आकाराचे अंडाकृती आकाश आपल्याला दिसते. तेवढ्या मधून दिसणार्‍या चांदण्या ही डोळ्याना सुखावत होत्या.

रात्री च्या शांततेत पिंडी वर पडणार्‍या पाण्याच्या थेंबाचा आवाज मस्त संगीता सारखा वाटत होता. आजूबाजूला ही पाणी ठिबकत वेगळेच संगीत तयार करत होते. पथार्‍या टाकून पडल्यावर टॉर्च गुहेच्या छतावर मारला. नेहमी दिसणार्‍या मोठ्या पाली तिथेच होत्या. छताच्या एका बिळामध्ये वाटवाघुळाच्या जोडीने पिल्ले दिली होती. त्याना खायला घालायला त्यांची लगबग उडाली होती. दर २-३ मी. एक वटवाघूळ येऊन बिळापाशी जाई आणि काही तरी खायला घालून परत अंधारात गडप होई. आई बापा पैकी कोणीही बिळा जवळ आले की लगेच पिल्ले चिराकायला सुरवात करत. थोडावेळ त्यांचा खेळ पहिला, फोटो काढण्याचा ही प्रयत्न केला. प्रत्येक चिराकण्याला आईबाप एक घास पिलाच्या तोंडात घालून पुढच्या घसाची सोय करायला अंधारात निघून जाई. आता झोप अनावर होऊन मी डोळे झाकले.

सकाळी सगळ्याना लवकर उठवून कॉफी करायला घेतली. सकाळी सकाळी गारवा जाणावत होता. सगळे चुलीच्या आजूबाजूला उभे राहून कॉफी ची वाट पाहु लागले. कॉफी बिस्कीटे आणि रात्रीची खिचडी गरम करून खाऊन घेतली.
आज तर जुना वासोटा सर करायचा होता. रस्ता माहीत नव्हता, वर काय असेल माहीत नव्हते, पण ८-१० वेळा नुसता वासोटा करून गेलो होतो. आणि दरवेळी म्हणायचो नेक्स्ट टाइम जुना वासोटा करायचा म्हणून.. पण यावेळी घरूनच ठरवले होते जुना वासोटा करायचा म्हणून. आज तो दिवस आला , एक मोठी दोरी पण बरोबर घेतली, दुपारी खाण्यासाठी काही पदार्थ घेतले आणि मोहीम सुरू झाली.

वासोट्या चा रस्ता धरला. हा रस्ता जरा दरी च्या कडेकडेने असल्यामुळे थोडे हळू हळू चाललो होतो. २ चेतन पैकी १ चेतन जरा स्थूल असल्याने त्याला जरा सांभाळून पुढे घेत होतो. डाव्या बाजूच्या डोंगरावर लांब एक गवा चारताना दिसला. तुळशी वृंदावन पासून वासोट्याच्या पायथ्यापर्यंत असणाऱ्या झाडी मध्ये मधेच एका ठिकाणी एका वटवाट्या ची अंडी दिसली,तिथे थोडे फोटो session झाले. आम्हाला घरट्या जवळ पाहून घर मालक खूप बोंबाबोंब करू लागले सगळे जंगल त्यांनी डोक्यावर घेतले त्यामुळे तेथून निघण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता काही वेळा मध्ये वासोट्याच्या पायथ्या ला पोहोचलो.

तिथून आता पुढचा रस्ता कोणाला हि माहित नव्हता. त्यामुळे शिवसागर तलाव कडे जाणारा रस्ता धरला. थोडे पुढे गेल्यावर उजवी कडे जुन्या वासोट्या कडे वळलो. रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रानकोंबड्या दिसल्या. पुढे करावीचे रान तुडवत निघालो, पडत पडत पुढे सरकत होतो. पुढे दिसणारी दरी कशी तरी चढून वर मोकळ्या भागात पोहोचलो. आता आम्ही पोहोचलो होतो वासोट्याच्या बाबूकड्या कडे असणाऱ्या माचीच्या खाली. सकाळचे १० वाजले होते. समोर जबरदस्त दृश्य होते. जोराचा वर वाहत होता .


२-४ ढग वाऱ्या बरोबर खेळत खेळत जुन्या वासोट्याच्या खांद्यावरून डोक्या वर चढत आकाशात विलीन होत होते. अशा मस्त ठिकाणीच नाश्ता करण्याचे ठरवले. ब्रेड, चिवडा, जॅम, बिस्किटे खाल्ली. बराच वेळ तिथे photography झाली आणि थोडे वाद हि झाले ... माझे आणी सागर चे. पण शेवटी सगळे गोड होऊन आम्ही पटकन जुन्या वासोट्याचा रस्ता धरला. समोर लक्ष्य होते त्यामुळे आधीच ठरवले कोठून जायचे, कोठून वर चढायचे ते . १५ मी. मध्येच अशाठिकाणी पोहोचलो जिथून चढणे खूप अवघड mhanaje दोरी लावूनच जाता येईल असे होते

आता हा उभा खडक पार केला की आम्ही जुन्या वासो ट्या वर पाय ठेवणार होतो. एका बाजूला दरी आणि दुसरी कडे उभा काडा
चेतन : मला जरा आवघड वाटताय इथून चढणे. दुसरी वाट शोधुया.
सागर : अरे काही नाही !! जाउ आपण वरती आहे ना आम्ही सगळे.
मी : मी आधी वर जातो आणि वरुन बघतो एखादी सोपी वाट आहे का ते ?
मी माझ्या बरोबर वीडियो कॅमरा आणि फोटोग्रॉफी कॅमरा घेऊन हळूहळू वर चढू लागलो. ५ मी. मध्ये मी वर चढलो. वाट तेवढी अवघड नव्हती पण चेतनबद्दल शंका होती. त्यामुळे नवीन वाट शोधू लागलो. थोडे पुढे २ खडका मधून वाट असल्यासारखे दिसू लागले. तिथून सगळ्यानी चढावे असे मला वाटले. नीट चढता येत नव्हते त्यामुळे मी आणलेली दोरी काढायला सांगितले. दोरीचे एक टोक मी वर झुडपाच्या बुंध्याला गुंडाळून घेतले आणि त्याचा आधार घेत सगळ्याना वर चढायला सांगितले.
प्रथम जरा स्थूल असणार्‍या चेतना ला वर घेतले . फरपटत फरपटत तो वर चढून आला. त्याला वर बसवून सागरला वर घेतले, मग दुसरा चेतन आणि शेवटी योगेश. जास्त त्रास योगेशचाच झाला.
त्याच्या उंची मुळे त्याचा हात वर कपारी पर्यंत पोहोचत नव्हता आणि दोर हि तेवढा लांब नव्हता. काही केल्या त्याला वर येत येईना. मग मीच झुडूपाचा दोर सोडून खाली उतरलो. एक टोक माझ्या हातात आणि दुसरे टोक खाली त्याच्या कडे फेकले. त्याने टोक धरून वर चढण्यास सुरुवात केली आणि वर पोहोचला.
आता आम्ही जुन्या वासोट्यावर पाय ठेवला होता. १० वर्षे ज्याची वाट पाहत होतो ती पूर्ण झाली. खांद्या इतकी वाढलेली करावी सगळीकडे पसरलेली होती. जांभूळ, अजनाची झाडी वाकडी तिकडी वाढलीली होती. मोठ मोठी दगडी खडक जिकडे तिकडे विखुरले होते. अगदी शांतपणे आम्ही चालत होतो. कधी आणि कुठून काय बाहेर येईल काहीही कल्पना नव्हती. थोडे पुढे गेल्यावर मोठमोठ्या गुहा, कापऱ्या दिसू लागल्या. काही गुहा तर इतक्या मोठ्या होत्या कि आम्ही सगळेजण अगदी आरामात त्या मध्ये झोपू शकलो असतो.
प्रत्येक जण अगदी सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत होता.

मध्येच एखाद्या गुहेमध्ये शिरून एखाद्या प्राण्याचे केस सापडतात का ते शोधात होतो. पुढे चालता चालता एक मोठा खडक समोर आला. त्याच्या वर सगळे मोकळे असावे असे वाटत होते. आकाश हि दिसत होते त्यामुळे त्याच्यावर चढण्याचा निर्णय घेतला. रस्ता शोधायला सुरुवात केली पण जिकडे तिकडे मोठमोठे कडे कापर्या च फक्त. अशीच एक कपारी शोधून त्याच्यातून वर चढण्याचे ठरवले. मी चढून वर गेलो. वर विस्तीर्ण पठार होते. लांब च लांब गवताळ माळरान.


सगळीकडे नजर फिरवली एखादा प्राणी दिसतोय का ते पहिले पण छे. मग पुन्हा खाली असलेल्या पोरांना वर घेण्यासाठी दोरी धरून उभा राहिलो. सगळे वर आले. आता सगळे मिळून पठार न्याहाळू लागलो. मागे शिवसागर जलाशय दिसत होता. चालत चालत पठाराच्या दुसर्या टोकावर गेलो. खाली दाट जंगल दिसत होते. तिकडे हि खाली उतरण्यासाठी एक मोठा कडा उतरणे गरजेचे होते. दुपारचे ३ वाजले होते पोटा मध्ये कावळे ओरडू लागले होते त्यामुळे जंगला मध्ये उतरण्याचा प्लान रद्द करून एका झाडा खाली बसून पोट पूजा केली. ४ वाजत आले होते. परतीचा प्रवास करायचा होता. त्यामुळे परत जिथून चढलो तिथेच पोहोचलो.

पटपट खाली उतरून परतीच प्रवास सुरु केला. आता लवकर नागेश्वरला पोहोचणे गरजेचे झाले होते कारण जवळचे पाणी संपले होते. जेवणानंतर हि पाणी मिळाले नव्हते. घसे कोरडे झाले होते. गडाच्या दुसर्या टोका वर पोहोचलो. त्या बाजूला एक कडा तुटून मुख्य कड्यापासून १-२ फूट बाजूला तरंगत असल्यासारखा झाला होता. त्याच्या वर उड्या मारून मस्त फोटो काढले ..



समोर वासोटा दिसत होता आणि ४-५ माणसाचे टोळके दिसत होते.. चित्र विचित्र आवाज काढत ते सुधा आमच्या कडे बघत होते. थोडा वेळ तिथे थांबलो.. दरवेळी वासोट्या वरून जो बाबूकडा पाहून प्रसन्न होत होतो त्याच कड्यावर उभे राहून वासोटा न्याहाळत होतो. मस्त वाटत होते. थोडा वेळ थांबून प्रवास पुन्हा सुरु केला. पुन्हा दोरी लावून जिथून चढलो तिथेच पोहोचलो ... पुन्हा दोरी लावून खाली उतरलो ... तिथून खाली उतरल्या उतरल्या वासोट्यावर पण जायचा प्लान ठरला. मग काय पळतच जिथे सकाळी नाश्ता केला तिथे पोहोचलो . आता एक चढ चढून वासोट्यावर पोचलो. तळयावर पोहोचलो. पोटभर पाणी पिले आणि बाबूकड्या च्या बाजूला गेलो. पुन्हा चर्चा सुरु केली कोठून कसे वर चढलो कुठे थांबलो.... वगैरे वगैरे ?




बरेच फोटो काढून घेतले ... थोडा अंधार पडायला लागला होता त्यामुळे नागेश्वरचा रस्ता धरला. उतरताना सागरला खूप त्रास होऊ लागला. ६:३० ला आम्ही नागेश्वर वासोटा आणि शिवसागर रस्ते जिथे मिळतात तिथे होतो .. जंगलामध्ये जाम अंधार दिसू लागला. torch बाहेर काढले आता सागर बरोबर चालणे आवश्यक होते. पूर्ण अंधार पडला. चालताना कोणत्याही झाडावर प्रकाश टाकला तर त्यावर हजारो किडे हलताना दिसायचे. लांब लांब पायाचे ते किडे प्रकाश पडल्या पडल्या इकडे तिकडे पळू लागत . जंगलाच्या बाहेर पडलो आणि नागेश्वरचा सुळका दिसू लागला. पण जरा विचित्र आणि भीती हि वाटू लागली ... पूर्ण गुहा ज्वाला नि भरली होती. तो सुळका पूर्ण पेटला होता. आमचे समान जाळून गेले कि काय, पटपट जाऊन काय झाले पाहावे असे वाटू लागले पण तसे हि करता येईना कारण एका बाजूला दरी आणि एकाबाजूला कारवीचे रान आणि त्यातून एका चेतना ला अशा भागातून अगदी सांभाळून घ्यावे लागत. हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता.. आम्ही चालत होतो काही वेळाने आग सुधा विझून गेली. नागेश्वर ला पोहोचलो तर तिथे एक मुंबई चा गट आला होता आणि त्यांनीच हि आग लावली होती.

त्याच्या शी गप्पा गोष्टी झाल्या. आम्ही जेवण तयार करायला घेतले. पुन्हा एकदा खिचडी केली आणि खावून घेतली. आज जरा गारवा जाणवायला लागला. जेवण झाल्यावर तर हूडहुडी भरण्या इतकी थंडी वाढली. काल नुसत्या बॅनियन वर झोपलो होतो आणि आज २ टी-शर्ट, स्वेटर घालून सुधा थंडी जात नव्हती. बराच वेळ शेकोटीच्या आजूबाजूला बसून होतो. उद्या परतीचा प्रवास करणार होतो. सकाळी सकाळी दुसरा ग्रूप उठून खाली उतरू लागला होता. आम्ही पण सगळे सामान आवरले पण सगळे जण म्हणत होते की कुठेतरी एक तासभर फिरून येऊ. म्हणून मग कुंडाकडून खाली जंगलमध्ये जाण्यासाठी निघालो. पण भरपुर फिरून सुधा काहीही दिसले नाही. आता १० वाजले होते. १०:३० ला चोरवण्या कडे उतरू लागलो. सागर निवांत उतरत होता .


हळूहळू उतरत २ ला आम्ही चोरवणे गावात उतरलो. ४ ला गाडी होती मस्त ओढ्यामध्ये आंघोळी करून घेतल्या. आणि बस स्टॅंड वर पोहोचलो आणि वडापाव खाऊन गाडी ची वाट पाहत बसलो होतो. शेजारीच मुले क्रिकेट खेळात होती त्यांच्या बरोबर थोडा वेळ क्रिकेट खेळून घेतले. गाडी आली आणि आमचा पुण्या कडचा प्रवास सुरू झाला.

Wednesday, November 24, 2010

पुन्हा एकदा वासोटा (०७-जून-२००३)

-------------------------------------------------------------------------------------


***************** वासोटा किल्ल्या वरील सुंदर हनुमान मूर्ती********


कोयना आणि वासोटा ट्रेक करण्याची ही माझी ६ वि वेळ. माझी सगळ्यात आवडती जागा. नागेश्वरच्या मंदिरामध्ये बसून समोर दिसणारा तो कोकण परिसर, ती नागेश्वराची सुंदर गुहा, तिथे असणारी ती रेखीव पिंड आणी त्यावर होणारा पाण्याचा अखंड अभिषेक. डाव्या बाजूला दिसणारा उंचपुरा वासोटा किल्ला, त्याच्या मागच्या बाजूला मीच तुझ्या पेक्षा उंच असे सागणारा जुना वसोटा आणि त्याचा बाबू कडा. गुहेच्या उजव्या बाजूच्या दरी कडे गेल्यावर दिसणारी डोंगराची बाळे. तिथे तासतास बसून राहावेसे वाटते. तिथे बसल्यावर दरीमध्ये अचानक एखादे उदमांजर नजरेस पडते. गरूड उडताना दिसतो, माकडाची टोळी खाद्य शोधायला निघताना दिसते. दुरून दरीमधून निळा शैल कस्तुरची शिटी कानावर पडते. संध्याकाळी भेकराचे आवाज ऐकू येतात.कसा कंटाळा येईल हो या सगळ्या गोष्टींचा कोणाला. दरवेळी काही तरी नवीन दाखवतो हा मला. असे हे सगळे वैभव कोणाला पहावेसे वाटणार नाही. म्हणून जमेल तेंव्हा जाऊन यायचे वासोट्याला.
तसाच पुन्हा एकदा निघालो अगदी ४ वर्षे हॉस्टेलवर राहिलेला विद्यार्थी ज्या ओढीने घरी जातो त्याच ओढीने.
पुन्हा वासोट्याला जायचे या खुशीमध्ये मी सगळी तयारी केली. यावेळी सुद्धा आम्ही ४ जणच होतो. मी, उदय,सागर आणि प्रविण. मी आणि उदय आधी वासोट्याला येऊन गेलो होतो पण सागर आणि प्रविण नवीन होते.
७-६-२००३ रोजी सकाळी ९ वाजता सातार्‍याला पोहोचलो. राहिलेली खरेदी करून आम्ही १० च्या बामाणोलि गाडीमध्ये बसलो. बामाणोलि ला १२ ला पोहोचलो. वन आधिकार्यांची रीतसर परवानगी घेऊन आम्ही एका खाजगी लॉंच ने कुसापूरचा रस्ता धरला. २:३० च्या दरम्यान आम्ही कुसापूरच्या हद्दी मध्ये पोहोचलो. बॅग बाजूला ठेवून कपडे काढून मनसोक्त शिवसागराच्या पाण्यामध्ये डुंबलो. पाण्यामध्ये बराच वेळ पळापळ, मारामार्‍या करून झाल्या. मग उदयने कुठून काय कल्पना आणली. सगळ्यानी आजूबाजूला असणारी माती सर्वांगाला लावली. डुककर किंवा गवे जसे चिखलामध्ये लोळतात त्याप्रमाणे आम्ही लोळलो. चिखल वाळेपर्यंत असेच बसलो आणि मग एकमेकांची अंगे घासून आंघोळी उरकत्या घेतल्या. इतके उद्योग केल्या मुळे भुका जाम लागल्या होत्या.
एका पिम्पळाच्या झाडा खाली बसून जेवण उरकून घेतले व नागेश्वरचा रस्ता धरला. रस्त्यामध्ये एका दगडाच्या बेचकीत मला चंडोल पक्षाचे वाटी सारखे घरटे दिसले. त्यामध्ये राखी चॉकलेटी ठिपके असलेली ३ अंडी होती. सगळ्याना अंडी आणि ते सुंदर घरटे दाखवून पुढची वाट धरली. गावा मध्ये एक मुलगा भेटला. त्याला मी लगेच ओळखले. मी, उदय आणि दुष्यंत प्रथम जेंव्हा कोयना अभयारण्यामध्ये फिरायला आलो होतो तेंव्हा हा मुलगा आमचा वाटाड्या होता. त्यानेच आम्हाला यावेळी नागेश्वरची वाट दाखवली. करवदे, आळु, आंबे खातखात आमचा प्रवास चालू होता. करवदे, आळु, आंबे च्या नादा मध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि दुसर्‍याच रस्त्या ने चालू लागलो होतो. मग एक कारवि चे रान तुडवत मूळ रस्त्याला लागलो.
त्याच रस्त्याने पुढे एक डोंगरची चढण आहे ती चढायला सुरूवात केली. चढावर चालण्याचा खूप त्रास होत होता .. खूप दम लागत होता.
प्रवीणला तर चालणे अवघड झाले होते. बसत बसत आम्ही नागेश्वरकडे सरकत होतो. संध्याकाळच्या आत नागेश्वरला पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे पुन्हा चालायला सुरूवात केली. मी आणि उदय पुढे चालत होतो. सागर आणि प्रवीण मगेच होते. आम्हालाही खूप दम लागत होता. मजल दरमजल करत सरकायचे आम्ही ठरवले... तसेच चाललो होतो मजल दरमजल करत पण तोंडाने पण म्हणायचे मजल आणि दरमजल ही आइडिया बंडा उर्फ उदयची . मी मजल म्हणून एक पाऊल टाकायचो, तो दरमजल म्हणून एक पाऊल टाकायचा. असे करत करत आम्ही बरेच पुढे आलो. मागे यांची काहीही चाहूल लागत नव्हती.

**************************************मी स्वता:

****बंडा (वेगळीच पोज)****

तरी आम्ही न थांबता पुढे चालत गेलो आणि एका टेकडीवर पोहोचलो. तिथे बसून यांची वाट पाहावी असे ठरवले होते. जवळ पाणी ही कमी होते. फक्त १ बाटली शिल्लक होती आणि त्याला सुद्धा अंबुस असा घाणेरडा वास येत होता. मला तो वाससुद्धा सहन होत नव्हता त्यामुळे पाणी पिणे दूरच. वर माथ्यावर असणार्‍या मन्दिरा समोरील झर्याचे पाणी पिण्याचे मी ठरवले होते. यांची वाट पाहत अर्धा तास आम्ही तिथेच बसून होतो आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो पण यांचा काही पत्ताच नाही.. समोरचे शिवसागर जलाशय आणि परिसर पाहण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही... मग एकदम आम्ही त्याना हाका मारायला सुरूवात केली. थोडा वेळाने प्रतिसाद मिळाला व ते वर चढताना दिसू लागले. मग आम्ही ही उठलो आणि एकदम मन्दिरा पाशी थांबायाचे असे ठरवून चालू लागलो. सतत आमची नजर वर किती चढन शिल्लक आहे हे पाहण्यासाठी जात होती. मंदिर टप्प्या मध्ये आले होते. तिथेच एक मोठी पांढरी वस्तू चमकताना दिसत होती. ती होती गव्याची कवटी. ती उचलून बंडाने एका खडका वर आणली. मी लगेच आजूबाजूला पाण्याचा झरा शोधण्यासाठी निघालो. पण प्रवाह पूर्ण कोरडा ठणठणीत होता. मला तिथे ही पाणी मिळाले नाही. काही वेळात हे दोघे ही येऊन पोहोचले. दोघे पूर्णपणे आडवे झाले.प्रवीणला चालण्याचा खूप त्रास होत होता. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हा पुढचा टप्पा पूर्णपणे गर्द झाडीमधून होता आणि जास्त चढ सुद्धा नव्हता. मी माझ्या मागे उदय, सागर आणि शेवटी प्रवीण असे आम्ही चालत होतो. मला या वाटेची पूर्ण माहिती असल्याने मी सगळ्यात पुढे असायचो. प्रवीण ने मला कप्तान पदवी बहाल केली होती. संध्याकाळी ६ ला आम्ही झाडीच्या टोकाला येऊन पोहोचलो .. समोर एक विस्तीर्ण पठार आहे त्यावर संध्याकाळी गवे चरायला आले असण्याची शक्यता होती.

*************गवा (शिंग मोडलेला)
त्यामुळे सगळ्याना शांत चालण्याची सूचना करून पुढे चालू लागलो. झाडीच्या समोरच एक गवा चारताना दिसला. तो एक भला मोठा नर होता. मी सगळ्याना खाली बसण्याचा इशारा केला आणीं कॅमेरा सज्ज केला. आजूबाजूला ३ गवे आणि एक पिल्लू चारताना दिसले. सगळ्याना गवे दाखवले व त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरकलो. पण लेन्सवर सूर्यकिरण येत होते त्यामुळे थोडा उजवीकडे जाऊन फोटो काढायचे ठरवले व शांतपणे सरकू लागलो. तेवढ्यात माझ्या पायाखाली काटकी मोडली व गवे सावध होऊन आवाजाच्या दिशेला पाहु लागले. मी लगेच फोटो काढला. कॅमेराचा आवाज ऐकून सगळे पळू लागले. मी झाडीतून बाहेर आलो आणि फोटो घेऊ लागलो. सगळे गवे झाडीमध्ये पळुन गेले पण नर तसाच थांबून माझ्याकडे पाहत होता. मी पण त्याच्याकडे सरकू लागलो. या गव्याचे उजवे शिंग वळून खाली कानापाशी आले होते. त्याचा फोटो घेतला .. तो सुद्धा पळत झाडी मध्ये अदृश्य झाला..
गव्यांच्या दर्शनाने ४ तहानलेले जीव ताजेतवाने झाले होते. ६:१५ झाले होते. समोर नागेश्वरचा सुळका दिसू लागला. पायाना पण वेग आला होता. आजूबाजूचे डोंगर दर्या पाहून प्रवीण आणि सागर चक्रावून गेले. बराच वेळ ते एकडे तिकडे बघत बसले. दरीचे फोटो घेऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. डावी कडे दरी मध्ये २-३ गवे चारताना दिसले. थोड्याच वेळामध्ये आम्ही
*********************नागेश्वर मंदिर***********************

नागेश्वरला पोहोचलो. आता तहानलेल्या घश्यानी डोके वर काढले होते. भरपूर पाणी प्यावे असे सगळ्यानाच वाटत होते. कुंडाकडे जाण्याआधी बाटली मध्ये जे पाणी होते ते सुद्धा फेकून बाटली स्वच्छ धुवून घेतली. मसालेभात करण्यासाठी लागणारे सगळे समान काढून आम्ही कुंडाचा रस्ता धरला. कधी तिथे पोहचतो आणि भरपुर पाणी पितो असे झाले होते. कुंडावर पोहोचलो आणि टॉर्चचा प्रकाश कुंडा मध्ये टाकला. डोक्याला हात लावण्याची वेळ आली. कुंडा मध्ये थेंबभर सुद्धा पाणी नव्हते.
माझे आधीच कोरडे पडलेले तोंड अजुन कोरडे झाले. रात्री जेवण नाही, पाणी नाही तसेच झोपावे लागणार होते. आता जवळपास पाणी मिळणे अशक्य . आता पाणी फक्त वासोटा किल्ल्यावरच त्यामुळे रात्रीच किल्ल्यावर जायचा विचार मनात येऊ लागला. पण प्राणी आणि इतर श्वपदांचे भय होतेच की. त्यामुळे तो विचार मनातून काढून टाकला आणि गुहे कडे परतलो.
नागेश्वराच्या गुहेमध्ये छतातून १२ महिने १८ काळ पाणी ठिपकत असते. त्याच्या ठिबकण्याने तिथे ठेवलेला तांब्या भरला होता. तांब्या कसला गडू होता. सगळ्यानी त्यामधील घोट घोट पाणी प्यायले. गुहेत चढताना पायार्‍याच्या उजव्या बाजूला असाच एक छोटासा खळगा आहे तिथे ही पाणी असण्याची शक्यता होती. तिथे ही घोट भर पाणी होते. पण ते पीणार कसे . एक कल्पना सुचली. एक पेन घेतल त्याची रिफील,टोपण काढून त्याचा स्ट्रो तयार केला आणि त्या घोटभर पाण्याचा चुसका मारला व तो खडडा अजुन खोल आणि साफ करून ठेवला जेणे करून जास्त पाणी साठेल.
रात्री बरोबर आणलेल्या तिखट पुर्‍या आणि गुळ असे काहीसे विचित्र जेवण करून घेतले. उदय आणि सागरने तर भरपुर कांदा खाल्ला. बिछने पसरून आम्ही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण छे !!! मला आणि उदयला आजिबात झोप लागत नव्हती. सागर आणि प्रवीण मस्त पैकी डाराडुर. आमचा ही थोड्या वेळा ने डोळा लागल्या सारखा झाला. पण मध्या रात्री पुन्हा जाग आली. तोंड पूर्ण कोरडे पडले होते. खाळग्यामध्ये पाणी साठले आहे का पाहण्यासाठी उठलो. बंडा पण होतच जागा. तो सुद्धा आला. मी तर स्ट्रो घेउनच होतो. पण त्या खाळग्यावर जे जीव रोज पाणी पितात त्यातील एक जीव तिथे बसून आधीच जिभल्या चाटात होता. ती होती एक भली मोठी पाल. तिचे पाणी पिऊन झाले होते आता ती तिच्या मोठ्या जिभे ने डोळे, ओठ नाक साफ करत बसली होती. तो प्रकार पाहून बंडा पाणी पिण्यास तयार होईना. पण मी पुन्हा एकदा चुसका मारला आणि सकाळ ची वाट बघत बिछान्या वर पडलो. रात्री थोडा डोळा लागला की लगेच पाण्या ची स्वप्ने पडत होती. आई मला तांब्याभर थंडगार पाणी देत आहे असे स्वप्न मला सारखे पडत होते. पण हे दोघे गाढ झोपले. मला पाण्याची स्वप्ने आणि सागर काय माहीत कसली स्वप्ने पडत होती, तो मोठमोठ्याने ओरडत आणि शिव्या देत होता. माझे तर हसून ह्सून पोट दुखण्याची वेळ आली होती. बंडा म्हणाला तो तुलाच शिव्या देत आहे इकडे आणल्या बद्दल. आम्ही पण त्याला उठवत नव्हतो. त्याचा आरडाओरड ऐकायला मज्जा येत होती. सकाळी कळले की त्याला झोपेमध्ये चावळण्याची सवय आहे.
सकाळी ज्यानी पाण्यामध्ये उच्छाद मंडला होता रात्री त्यांच्यावर अशी वेळ येईल असे वाटले ही नव्हते.
************************************सकाळी धुके नागेश्वर मंदिरामधून***************

सकाळी लवकर उठून वासोटा गाठायचा ठरले होते. पण लवकर उठून ही काहीही उपयोग झाला नाही. जाम धुके पडले होते. आमच्या चादरी ओल्या झाल्या होत्या. समोर निळा शैल कस्तुर शिळ घालत होता. धुके पाहत बसण्याची अजिबात इच्छा नव्हती. ७ ला थोडे धुके कमी झाले आणि आम्ही वासोट्याच्या दिशेला चालू लागलो. काल दुपार पासून तहानलेलो होतो. वासोट्याला पाणी नक्की मिळणार त्यामुळे पाऊले झपझप पडत होती. तोंड पुन्हा कोरडे पडू लागले. झाडाझुडपाच्या पानावरचे पाणी चाटुन तोंड थोडे फार ओले करण्याचा प्रयत्न चालू होता. काळ पासून चालून चालून शरीरातून पूर्ण घाम निघाला होता त्या बरोबर क्षर निघत होते. अंगावर मिठासारखा थर जमा झाला होता.
गर्द झाडीतून प्रवास चालू होता. भरपुर चालणे झाले होते पण आता घाम येणे बंद झाले होते. या वर्षी नागेश्वर ते वसोटा मार्गावर सगळ्यात जास्त विसावे पडले होते . खजूर खात, गोळ्या खात आमचा प्रवास चालू होता.
माझे लक्ष्य मात्र काही दिसते का या कडे होते. झाडा चे शेंडे,बुंधे, दगड, झाडाच्या ढोली, सगळे निरखून पाहत मी चाललो होतो. वाटेत बरेच पक्षी दिसले. पण कोणीही काहीही पाहण्याच्या मनस्थीती मध्ये नव्हते. पलपचोळ्या मध्ये मला एक मस्त बेडूक दिसला त्याचे फोटो काढून आम्ही पुढे झालो.
प्रवीणला आता आजिबात चालण्याची शक्ति राहिली नव्हती. कालपासून आम्ही १०-१५ किलोचे समान पाठीवर घेऊन बिना पाण्याचे चालत होतो. त्याचाच परिणाम होता हा. प्रवीण बसेल तिथे आडवा होत होता. आम्ही वासोट्याच्या अगदी पायथ्याला होतो. आता खरा चढ चढायचा होता. त्याला कसे घेऊन जायचे याचा विचार करत होतो . मग मी आणि उदय वर जाऊन पाणी घेऊन यावे असा आग्रह त्याने धरला. तुम्ही हळू हळू वर चालत या, मी आणि उदय जाऊन तो पर्यंत पाणी घेऊन येतो असे सांगून मी आणि उदय गडाकडे निघालो.
आणि गडावर पण पाणी नसेल तर ????? हा विचार येऊन पोटात गोळच आला. मग काय करायचे हे सुद्धा ठरले होते.तिथून सरळ उठून शिव सागर जलाशयाकडे चालत जायचे.. त्यामुळे चालण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप दम लागत होता. पुन्हा तेच मजल दरमजल म्हणत म्हणत वर चढलो. पाण्याच्या टाकीकडे कूच केले. दोन्हीही टाक्यामध्ये पाणी भरपुर होते.नुसते पाणी बघून पाणी पिण्यपेक्षा ही जास्त आनंद झाला.

***********वासोट्या वरील स्वच्छ सुंदर पाणी.. हा!! हा!! हा!!**************

बाटली भर पाणी काढले आणि भरपूर पाणी पिऊन घेतले. डोके शांत झाले, पोट शांत झाले, शरीर शांत झाले. तहान लागण्याचा आणि पाण्याचा शरीरसाठीच्या उपयोगाचा तो परमोच्च बिंदू होता. पाणी मिळण्याआधीचे शरीर आणि पाणी पिल्या नंतरचे शरीर या मधील फरक लगेच जाणवत होता. आत्तापर्यंत अजिबात घाम येत नव्हता पण पाणी पोटात गेल्या वर घामाच्या धारा सुरू झाल्या. शरिराने स्वता: रोखून धरलेला पाण्याचा प्रवाह आपोआप सुरू झाला. शरीर गार झाले आणि आत्मा थंड झाला. आमचे तर शरीर शांत झाले होते आता त्यांची आठवण झाली.
त्या दोघा ना बोलावाण्या साठी मी दरी च्या टोका वर गेलो. दोघे ही जवळच पोहोचले होते. पाणी भरपुर आहे असे सांगितल्यावर त्यांचाही चालण्याचा वेग वाढला. मी एका बाटलीमध्ये पाणी साखर आणि मिठचे मिश्रण तयार केले. ते पिल्यावर तर अजुनच बरे वाटू लागले. सागर आणि प्रवीणला तेच पाणी प्यायला दिले. थोडा वेळ शांतपणे बसल्यावर प्रवीणला बरे वाटू लागले .. हुरूप आला. काल पासून जेवण ही नीट झाले नव्हते त्यामुळे मसालेभात करण्यासाठी तयारी केली. आता काय पाणी मिळाले होते आणि पोटात ही गेले होते त्यामुळे इकडे तिकडे फिरून जरा निरीक्षण केले. तळ्यकाठी गव्याचे भरपुर ठसे दिसले.

मसालेभात तासाभरात तयार झाला. जेवण चालू असतानाच एक ग्रूप तिथे आला. भात खात खातच पुढचे प्लॅनिंग झाले होते. जेवणानंतर गड फिरायचा ठरले. जेवण झाल्यावर सामान एका झुडुपात लपवून आम्ही बाबूकड्याच्या वाटेला लागलो. रस्त्यामध्ये बर्‍याचवेळा निलगिरी वुड पिजन दिसले. काही वेळात त्या विशाल बाबूकड्या वर पोहोचलो. पाताळात घुसलेली दरी पाहिली की तिथून पॅराग्लाइडिंगच करत जावेसे वाटते. समोरच्या कातळामध्ये काय असेल, तिथे कोणते प्राणी पक्षी असतील. ते आपल्याला कधी पाहायला मिळतील का असे प्रश्न मला पडतात.. समोर जुना वासोटा उभा होता.तिथे कधी तरी जायचे. एक मुक्काम तिथे करायचा असे मी मनाशीच ठरवले आहे. त्याच दिवसाची वाट पाहत आहे मी. तिथे फोटो सेशन झाले आणि आम्ही परत फिरलो. समान उचलून महादेवाच्या मंदिराची वाट धरली.

थोडा वेळ विश्रांती घ्यावी यावर सगळ्याचे एक मत झाले व चटया बाहेर निघाल्या. पडून अर्धाच तास झाला असेल तोच एक पुण्याचा ग्रूप येऊन पोहोचला. त्यानी पाण्यामध्ये टाकायचे औषध मागितले. त्यांचा सुद्धा आज तिथेच मुक्काम पडणार होता. ४ वाजता आम्ही पुन्हा गड फिरायचे ठरवले. समान आवरून आम्ही मारुती मंदिराचा रस्ता धरला. माझा आणि अस्वलाचा झालेला आमना सामना मी कृतीने करून दाखविला. हे सगळे ऐकून झाल्यावर सागर आणि उदयने आड वाटेने ताई तेलिणिच्या वाड्यात प्रवेश केला. मी सुद्धा त्यांच्या मागे निघालो . माझी नजर इकडे तिकडे भीरभिरत होती. तेवढ्यात नजर एका

************************चापडा.*************************

********************चापडा.********************

******************विषदन्त***************

वेटोळ्यावर जाऊन थांबली. तो एक बांबू पीट वाइपर होता. उंच झाडावर शांतपणे बसला होता. लॉंच मध्येच उदय ला मी, मला साप दिसावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानेपण माझ्या पाठीवर थाप मारुन दिसणारच साप असा होकार भरला होता आणि माझ्याच मुळे दिसणार असेही म्हणाला.. त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली साप पण दिसला आणि त्याच्या मुळेच दिसला कारण ते जर आडवाटेने गेले नसते तर मी कशाला गेलो असतो तीकडून आणि मग ते वेटोळे मला कसे दिसले असते. सगळ्याना बोलावून ते झाड दाखवले आणि म्हणालो की या झाडावर एक साप आहे शोधून दाखवा. कोणाला ही तो साप सापडला नाही असा तो मिसळुन गेला होता आजूबाजूच्या रंगामध्ये. त्याचे आहे त्या पोज़ मध्ये फोटो काढून त्याला एका काठीवर घेतले. तिथे त्याचे फोटो काढून त्याला सोडून दिले. तिथून आम्ही नागेश्वराच्या बाजूला असणार्‍या माची वर जाऊन बसलो.

************तुळशी वृंदावन**********
आजूबाजूला गडाच्या कड्यावर सगळीकडे उदमांजराची विष्ठा दिसत होती.
माची वा बसून रात्री खाली दरी मध्ये काही दिसते का हे बघणार होतो. त्याप्रमाणे माची वर स्थानापन्न झालो. ७ वाजले होते. समोर सूर्य नारायण दिवसभरा चे काम संपवून मावळतीला निघाला होता. ते सुंदर दृष्य बघत ओळीने त्या माचीवर बसलो. समोर कारविच्या झाडीमध्ये विसलिंग थ्रश मस्त शिटी मारत बसला होता. खाली एका छोट्याशा मोकळ्या जागे मध्ये एक प्राणी चारताना सागरला दिसला. तो गवा होता.बराच वेळ बसून होतो. ८ वाजत आले होते. आम्ही उठलो आणि मन्दिराकडे जायला निघालो. जंगलामधून घुबडांचा आवाज येत होता. मध्येच एखादा रातावा ही ओरडत होता.

**************चहा तयार झाला.************************


पुण्याहून आलेल्या ग्रूपने मन्दिरा बाहेर पथार्‍या टाकल्या. आम्ही ४ जण आणि त्यांच्यातील २ लहान मेंबर मन्दिरामध्ये झोपणार होतो. गप्पा मारत मारत मसालेभात संपवला आणि झोपण्यासाठी आत गेलो. रात्री चे १०-१०:३० झाले असतील. मस्त झोप लागली होती पण दोन एक तासात एकदम गडबड सुरू झाली. उठून बघतो तर बाहेर पाऊस पडू लागला होता त्यामुळे बाहेर झोपलेले सगळे जण आत मध्ये आले होते. त्या ४ बाय १४ च्या मन्दिरामध्ये १३ जण बसलो होतो. झोपणे तर दूरच पण नीट बसता ही येत नव्हते. गाभारा रिकामा होता पण जिकडे तिकडे मोठ मोठी बिळे आणि कपार्‍या असल्या मुळे आत कोण जात नव्हते. इथे वाकडे तिकडे बसून रहाण्यापेक्षा आत मध्ये नीट झोपता येईल असा विचार करून मी चादर घेऊन सरळ आत गेलो. टॉर्चने सगळी कडे नीट पाहून घेतले आणि तिथे झोपी गेलो. सकाळी ७ ला जाग आली, चहा नाश्ता झाला. आज आम्ही खाली जंगलामध्ये जाणार होतो आणि तो ग्रूप चोरवणे मार्गे खाली कोकणात उतरणार होता. फोन नंबरची देवाणघेवाण करून आम्ही निरोप घेतला. रस्ता सोडून अतिशय अवघड आणि दाट झाडीतून चालू लागलो. सगळे जण एकएकदा आपटले सुद्धा. नुसता काळोख आणि किरर्रर शांतता होती. ओढ्याचे प्रवाह, पडलेले मोठ मोठे ओन्डके पार करत करत आमचा प्रवास चालू होता. मध्येच एखादे मोठे बिळ किंवा गुहा दिसायाची टॉर्च बरोबर होतीच. मग सावधपणे आत डोकवून बघायचे. आजूबाजूला पडलेली हाडे, साळीदरचे काटे निरखायचे, काही ठिकाणी सडलेल्या मटणासारखा वास यायचा. अशा गुहा साळीदरच्या असु शकतात. पुढे एक विशाल पिम्पळ वर्गीय झाड दिसले. ते विशाल झाड पाहून खूप मस्त वाटले.
असे झाड वाढण्यासाठी १००-१५० वर्षा चा काळ लागतो पण माणूस २ मिनिटा मध्ये त्याला जमीनदोस्त करतो.
प्राणी, साप यांच्या बाबता ही मला तेच वाटते. एक एक वर्षे पूर्ण करण्यासाठी त्याना किती नैसर्गिक व अनैसर्गिक सन्कटाना सामोरे जावे लागते. आणि काठी किंवा कुर्‍हाडीच्या एका फटक्यात माणूस त्यांचे हे सगळे कष्ट,प्रयत्न वाया घालवतो, त्यांचे जीवन संपावतो. विचित्र आणि क्रूर पणा ची हद्द असते ती आणि परत एका फटक्यात माराल्याची घाणेरडी मीजास. असह्य आहे असे पहाणे.

******************सागर. ***************
झाडा वर मधामश्यांची भरपूर पोळी होती. झाडाचे फोटो काढून आम्ही पुढचा रस्ता धरला. चालत चालत आम्ही एका नाल्याला येऊन मिळलो. हाच तो नाला नागेश्वरा कडून शिवसागर जलाशयाकडे जातो. आम्ही नागेश्वराच्या दिशेने चालू लागलो. वाटेत भरपूर फुलपाखरे दिसली त्यामध्ये कॉमन क्रो, ब्लू मॉर्मोन, स्ट्राइप्ड टाइगर,ग्लोसी टाइगर,कॉमन गल इत्यादी होती.
काहीवेळा ने डाव्या बाजूला झाडावरुन खाली उतरून काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्यादिशेला झाडी मध्ये शिरलो, फक्त पानांचा आवाज येत होता पण काहीही दिसत नव्हते. तसेच सगळ्याना आत येण्यास सांगून झाडीमधूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत भरपूर शेकरू दिसले. आम्ही परतीच्या वाटेवर होतो. ३ वाजले असतील . अजुन बराच वेळ असल्याकारणाने आम्ही एका ठिकाणी बसून काही दिसते का ते पाहणार होतो. एक जागा निवडून स्थानापन्न झालो ... जंगलाच्या मध्येच अगदी मोठे दगड होते आणि आजूबाजूचा परिसर जास्त दाट ही नव्हता. त्यामुळे तिथे काही तरी दिसण्यची शक्यता आहे असे वाटून आम्ही तिथे बसलो. पण बराच वेळ बसून ही काही हालचाल नाही . अजुन किती चालायचे आहे गडावर पोहोचण्यासाठी हे ही माहीत नव्हते. त्यामुळे उठून गडाचा रस्ता धरला. ५ ला पोहोचलो सुद्धा गडावर. पुन्हा भात शिजवायला घेतला. बाकीचे भात करत बसले आणि मी एक लपण करण्यत गुंतलो होतो. तळ्याच्या बाजूलाच जरा दूरवर झुडूपाचा आडोसा घेऊन लपण तयार केले. रात्री तिथे बसण्याचा इरादा होता. कारण सकळि गड उतरताना गडावरुन खाली जाणार्‍या बिबट्यचे ठसे दिसले होते. तो पुन्हा जर पाण्यावर आला आणि आमचे नशीब असेल तर दिसेल. अशी एक अटकळ मनात बाळगून आडोसा तयार करत होतो. आडोसा छान तयार झाला होता.

**********************खिचडी ची तयारी.********************


****************खिचडी चा मस्त तवन्ग.****************
भात खाऊन पुन्हा गडावर साप शोध मोहिम हाती घ्यायची होती. भात खाऊन प्रथम काल दिसलेल्या चापड्यापाशी गेलो. पण तिथे काहीही नव्हते आणि सगळा गड पालथा घातला पण एका पिसोरी हरणाशिवाय काहीही दिसले नाही. पुन्हा मन्दिरापाशी
आलो. अंधार पडू लागला. भात खाऊन गप्पा मारत मन्दिरासमोर बसलो होतो. सगळे कंटाळले होते त्यामुळे रात्री तळयावर जाऊन बसायचा प्रोग्रॅम रद्द झाला आणि तिथेच गप्पा मारत बसावे असे ठरले. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या. मला दरीतून सारखा काहीतरी आवाज येत होता पण काही प्राणी असला तरी काय उपयोग, दिसणार तर नाहीच असे समजून आम्ही नुसते आवाज ऐकत होतो. पण शेवटी न राहवून मी उठलो आणि टॉर्च ने खाली शोधू लागलो. दरी न्याहाळत असताना झाडावर २ डोळे चमकले. डोळ्या मागे कळसर भाग दिसला. जरा बाजूला सरकून मी त्याच्या सरळ रेषेत आलो. आता चित्र जरा स्पष्ट झाले .. ते एक टोडि कॅट म्हणजे मसण्या उद होते. झाडा वर एकडे तिकडे भक्ष शोधत फिरत होते. मधूनच ते आजूबाजूला बघत होते. एकदम आमच्या कडे बघितल्यावर त्याचे डोळे हेड लाइट सारखे चमकायचे. थोडावेळ त्याच्याकडे पाहून त्याला त्याचे काम करू देण्यासाठी टॉर्च बंद केला. पण काही वेळात त्या झाडा वरुन बराच जोरजोरात पळण्याचा आणि काटक्या मोडल्याचा आवाज आला. म्हणून पटकन त्या झाडावर प्रकाश टाकला. तिथे अजुन एक प्राणी दिसला ते ब्राउन पाम सिवेट (तपकिरी उद मांजर ) होते. ते मसण्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते.
मसण्या तपकिरी उद मांजरा कडे लक्ष ठेवून गड चढू लागले. आमच्या अगदी समोरूनच ते गड चढत होते. थोड्याच वेळात ते गड चढून आमच्या समोर आले आणि छोटासा गुरूगुरटा सारखा आवाज काढून पळत दुसर्‍या बाजूच्या काड्यावरुन खाली उतरून गेले.. आम्ही त्याच्या मागे पळालो पण ५ सेकंदा मध्ये ते दिसेनासे ही झाले होते. परत ब्राउन पाम सिवेट पाशी आलो. ते अजुन खालीच काही तरी खात बसले होते.
सागर व प्रवीण झोपण्यासाठी मंदिराकडे गेले. मी आणि उदय त्या सिवेटला न्याहाळत बसलो होतो. ते उदमांजर ही आता वर चढू लागले. ते वर चढून माझ्या अगदी समोर ४-५ फूटावर येऊन बसले. मी त्याच्यावर टॉर्चचा झोत धरला होता. त्याला त्यामुळे काही दिसत नव्हते पण प्रकाशाच्या मागे काही तरी आहे याची जणिव होती. अगदी सावधपणे ते आपले काम करत होते. पाय चाट, कुठे कान खाजव असे उद्योग चालू होते... हे जंगली जनावर माझ्यासमोर अगदी ५ फुटावर बसून हे सगळे करत होते माझा तर विश्वासच बसत नव्हता. थोडावेळा ने साहेबानी आमच्या समोर शी केली आणि पुन्हा खाली उतरू लागले .. जवळ जवळ २-३ मिनिटे ते आमच्या समोर बसले होते. उतरताना सारखे मागे वळून बघत होते. मी त्याला पूर्ण खाली जाई पर्यंत न्याहळत होतो. ते पुन्हा त्याच झाडा वर चढले आणि खाद्य शोधण्यात गुंग झाले. त्याने केलेल्या शी मध्ये बर्‍याच प्रकारच्या बिया होत्या.
सगळी कडे धुके दाटू लागले होते, नाइलाजाने मला उठून मंदिराचा रस्ता धरावा लागला. अन्थरुणावर पडून ही त्या उदमांजरचे चित्र डोळ्या समोरून जात नव्हते. वाईट इतकेच वाटते की त्याला मी कॅमरा मध्ये बंद करू शकलो नाही.

दुसर्‍या दिवशी आम्ही नागेश्वर वरुन खाली चोरवणे गावात उतरून घरी जाणार होतो. निघण्यापुर्वी मारुती मंदिर आणि महादेव मंदिर साफ करण्या चे ठरवले होते. सकाळी उठून नाश्ता करून महादेव मंदिर साफ करण्याचे काम हाती घेतले.
मंदिरासमोर व वर उगवलेली सगळी झाडे काढली. त्यांच्या मुळावर रॉकेल उतून ते पेटवून दिले. झाडाच्या फांद्यानी मंदिराचा परिसर स्वच्छ झाडून घेतला. कडेला विखुरलेली दगडी व्यवस्थित रचली. गाभार्‍यातील कचरा साफ केला. शिवलिंग स्वच्छ धुवून घेतले.. समोर निराजन लावले.. नुसत्या त्या निरंजनाने परिसरात एक वेगळेच चैतन्य जाणवू लागले. महादेवचरणी मस्तक टेकवून आम्ही आमचा मोर्चा मारुती मंदिराकडे वळविला.
गाभार्‍या तील सगळा पालापाचोळा काढून बाहेर भिरकावला. प्रवीण तर कलाकुसरच करत बसला तिथे. आजूबाजूचे दगड एकत्र करून त्याने मंदिरामध्ये जाणारा रस्ता बाजूला असलेला चौथारा सजवला. मंदिराच्या भिंतीवर उगवलेले शेवाळे काढले. मग मारुतीला ही पाण्याचा आभिषेक झाला. दम लागला पण समाधान ही वाटत होते. थोडीशी घोषणा बाजी झाली आणि आम्ही सामानाची आवारा आवर करायला महादेव मंदिरापाशी आलो. समान तसेच उचलून तळे गाठले. हातपाय धुवून जरा तिथेच विसावलो. उदयाला जुन्या वासोट्या वरुन २ मोठे पक्षी उडत येताना दिसले, ते ग्रेट पाइड हॉर्नबिल होते. पंखाचा मोठा आवाज करत ते रेडे घाटामध्ये उतरले. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून नागेश्वरचा रस्ता धरला. आता जवळ पाणी भरपुर होते. घड्याळ २ वाजल्या चे दाखवत होते. एकदम तुळशी वृंदावन पाशी थांबायाचे ठरवून आम्ही चालू लागलो. झाडीमध्ये शिरताच आमच्या उजव्या बाजूला काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्या दिशेला पळालो. एक मोठा पूर्ण वाढ झालेला सांबर नर होता. त्याच्या मागे २ माद्या सुद्धा दिसल्या. झाडीमध्ये बरेच शेकरू,वानरे, माकडे दिसली. दीड तासामध्ये नागेश्वर गाठले. पिशव्या तिथेच खाली ठेऊन वर गुहे मध्ये गेलो. २ दिवसा पुर्वी आमची हालत खूप बेकार झाली होती.. इथेच तो मुक्काम होता . आम्हाला तेच तेच आठवत होते. कसा कोणाला त्रास झाला. कोण कसे वागत होते.या पुढे काय करायचे यावर एक परिसांवादच सुरू झाला.
हे सगळे चालू असताना बाहेर ऋतू बदलला. मस्त उन्ह पडलेले होते आता त्यांची जागा काळ्या ढगानि घेतली. सुसट्याचा वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. मोराला आनद व्हावा तसा आम्हाला आनंद झाला. माझे मयूर नृत्य सगळ्यानी मस्त एन्जॉय केले. तिथे असणारा खराटा पीसार्‍या सारखा मागे धरून सैरा वैरा धावलो होतो मी. मस्त मज्जा आली. हसून हसून पार पोटाचा भुगा झाला... पाऊस थांबला नागेश्वरच्या पाया पडून आम्ही खाली उतरू लागलो.

********************नागेश्वर च्या वाटे वरून वासोटा. *****************
थोडे खाली उतरल्यावर दुर्बिण गुहेत राहिल्याचे लक्षात आले. सागर आणि प्रवीण परत वर गेले आणि दुर्बिण घेऊन आले. उतरताना पाय लटलट कपू लागले. बरेच खाली उतरलो . ७ वाजले असतील. बंडाला गुडघ्याचा त्रास जाणवू लागला. त्याला समान घेऊन चालणे शक्य होत नव्हते. त्याचे काही समान सागरने घेतले व चालणे सुरू केले. गाव जवळ आले पण आम्ही रस्ता चुकलो. गावातील दिव्याच्या दिशेने चालायचे ठरवून आम्ही चालू लागलो . पण गाव काही लवकर येईना. आम्ही रस्ता चुकलो आहे हे गावातील एका माणसाला कळले. त्याने लांबूनच रस्ता सांगितला आणि आम्ही रस्त्याला लागलो. आजूबाजूला लाखो काजवे झाडावर गर्दी करून बसले होते. झाडावर रोषणाई केल्या सारखे ते दिसत होते. ते दृश्य बघत आम्ही गाव गाठले. एका वृद्ध माणसाने आम्हाला घरी नेले. पाणी आणि साखर पुढयात देऊन त्याने त्याचा आग्रह केला. त्याला ही माहीत होते की जास्त परिश्रम झाल्यावर गोड काहीतरी शरीरात जाणे जरुरीचे असते.. आम्ही ते खाऊन त्यांचा निरोप घेतला आणि मंदिर गाठले.
मंदिरामध्ये पोहोचल्या वर हातपंपा खाली मस्त पैकी आंघोळी करून घेतल्या ३ दिवसानि आंघोळी करत होतो. अंग मोकळे मोकळे वाटू लागले. ताजेतवाने झालो. मग जेवणचि तयारी सुरू केली. गावातील एका व्यक्तीने स्टॉव्ह आणून दिला त्यामुळे भात शिजवायला जास्त त्रास झाला नाही. ११:०० ला जेवण झाले आणि आम्ही झोपायला मांदिरामध्ये गेलो.
मंदिर अतिशय सुंदर होते. नवीन बांधणीचे होते, पण कलाकुसर चांगली होती, जागा ही प्रशस्त होती. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले दिसले. मंदिरासमोर एक मोठे पिम्पळाचे झाड आहे. सकाळी त्या झाडावर भरपूर पक्षी येतात. एकदा तर मला त्या झाडावर सकाळी सकाळी एक घोरपडी चे पिल्लू ही दिसले होते.
रात्री पुन्हा एकदा सागर झोपे मध्ये ओरडु लागला. शिव्या पण देत होता. पहिल्या दिवशी आम्ही जंगलामध्ये होतो. तिथे हे सगळे शब्द, वाक्यप्रचार ऐकायला कोणीही नव्हते. पण इथे आम्ही आता गावामध्ये होतो. त्याला जरा उठवून शांत झोपायला सांगितले. मी ही मग आडवा झालो.
सकाळी उठून तोंड धुवून घेतले, बाकी तिघे जण प्रत:विधी साठी गेले असताना मंदिरापाशी एक वृद्ध गावकरी आले. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. पुर्वी कसा पाऊस पडायचा आता काय बदल झाले आहेत हे ते सांगत होते.
बोलता बोलता त्याने पुढे सांगायला सुरूवात केली. ते ऐकून काहीतरी वेगळेच वाटू लागले. ते गृहस्थ सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेने मध्ये शिपाई होते. ते टोकियोला ही जाऊन आल्याचे ते सांगत होते. मी तल्लीन होऊन त्याच्या गोष्टी ऐकत बसलो. पानसुपारी खाऊन ते घराकडे निघून गेले. झालेली घटना मी पोराना सांगितली. सगळेच म्हणाले मुर्खा फोटो का काढला नाहीस त्यांचा. खरे तर मला काहीच सुचले नव्हते त्यावेळी.
समान आवरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
चोरवणे-चिपळुन-महाड-भोर असा प्रवास करून आम्ही घरी पोहोचलो. वरंध घाटामध्ये २ कोल्हे, साप असे प्राणी ही दिसले.
भरपुर भूक लागली होतो. पण भोर पूर्ण बंद झाले होते. रूमवर जाऊन झोपण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता.
उपाशीच झोपलो.
या ट्रेक मध्ये पाण्यावीना झालेली आमची अवस्था न विसरण्या सारखी होती.



Wednesday, November 17, 2010

दाजीपुर गवा अभयारण्य २५-०३-२००३




यावेळी सगळ्यात मोठी टीम होती ट्रेकवर जाण्यासाठी. मी, उदय,प्रवीण,महेश,सागर,समीर व आशुतोष मोठी टीम !! कारण जास्त लोक असले की प्राणी दिसत नाहीत असे मला वाटते त्यामुळे जास्त लोक नसतात. पण यावेळी ६ जण आणि सगळे नवनवीन गडी. शांत चालायचे अशी विनंती करून आम्ही दाजीपुरला रवाना झालो.
सकाळी ८ वाजता शिरवळ स्टॅंडवरुन कोल्हापूरचा प्रवास सुरू झाला. कॉलेजमध्ये असल्या कारणाने जवळ जास्त पैसे नसायचे त्यामुळे एसटी भाडे परवडत नसे. त्यामुळे थोडी प्रवास भाड्यामध्ये तडजोड करून आमचा प्रवास टेंपोच्या टपा वरुन सुरू केला. गप्पा, ट्रेक चे प्लॅनिंग, गाणी म्हणत प्रवास चालू होता. दुपारी एकला कोल्हापूरला पोहोचलो. निघताना सकाळ होती. कोवळे उन्ह बरे वाटत होते टेंपोच्या टपावर पण दुपार पर्यंत उन्हा ने करपून गेलो.प्रवासात उन्हा पासून वाचण्यासाठी चटई ,चादर बाहेर निघाली होती. ती परत बॅग मध्ये भरून कोल्हापूर स्टॅंड गाठले. कोल्हापूर वरुन गाडी पकडून आम्ही ४ ला दाजीपुरला पोहोचलो. नदीवर मस्त पैकी पोहून घेतले. चहा मारुन संध्याकाळी ७ ला अभयारण्याचा रस्ता धरला. पहिला मुक्काम २१ किमी दूर असणार्‍या टॉवर वर करण्याचा बेत होता. झप झप पाऊले उचलत डिगस गावाचा रस्ता धरला. निरव शांतता होती फक्त आमच्या पाऊलाचा आवाज येत होता. अगदी एक किमीच चाललो असेल तेवढ्यात सगळी शांतात भंग पावली. रस्त्याच्या कडेलाच एक सांबर भेदरुन ओरडल्याचा आवाज आला. त्या शांततेत आवाज अगदी मोठा येत होता आणी घुमत ही होता. आणि आमच्या पासून जास्त अंतर ही नव्हते.


ते आम्हाला बघून ओरडले का कोणता शिकारी प्राणी होता आजूबाजूला काहीच कळले नाही. ५-६ वेळा ओरडून ते दूर गेले आणी शांत झाले. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत डाव्या बाजूला झाडी मध्ये हालचाल जाणवली. टॉर्च त्या दिशेला मारला पण काही दिसत नव्हते. थोडा पुढे जाऊन पहिले तर एक प्राणी दिसला. झाडी मध्ये इकडे तिकडे भक्ष्य शोधताना तो प्राणी माझ्या दृष्टीस पडला. ते खवल्या मांजर असावे. माझी चाहूल लागून ते लगेच दूर पळून गेले. गगनगिरी आश्रमा पर्यंत आम्हाला सांबराचे आवाज, खवल्या मांजर आणि ससा दिसला होता. तिथून जरा पुढे निघालो आणि वाघाच्या पाण्याचा रस्ता धरला. आश्रमापासून थोडे पुढे गेल्या वर डाव्या बाजूला आमच्या पासून ५० मी. वर एक सांबर बसलेले दिसले. शांतपणे बसून ते आमच्या कडे पाहत होते. थोडा वेळ तसेच बसून राहीले आम्ही ही थोडे पुढे गेलो. २-३ पाऊले पुढे गेलो असेल की लगेच ते उठले आणि झाडी मध्ये दिसेनासे झाले. कुठेही न थांबता एकदम वाघाच्या पाण्यावर थांबायाचे ठरवले होते. रात्री ११:३० ला आम्ही वाघाच्या पाण्यावर पोहोचलो. खाली उतरून पाणी पिले आणि बाटल्या ही भरून घेतल्या. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही टॉवरकडे कूच केली.


टॉवर आता ५-६ किमी दूर राहिला होता. पाऊले झपझप पडत होती. जंगलातून चालताना मी कोणालाही बोलू देत नव्हतो. बोलण्या मुळे प्राणी जवळ ही थांबणार नाही आणि आपल्याला काहीही दिसणार नाही असे मला वाटत होते. त्यामुळे कोणीही बोलत नव्हते सगळेजण शांतपणे चालत होते. मध्यरात्री २ ला आम्ही टॉवरला पोहोचलो. टॉवरच्या पलीकडे पाण्याचा तलाव आहे. तिथे पाणी आहे का नाही ते पाहण्यासाठी मी आणि महेश (आण्णा) तिकडे जाऊ लागलो. बरोबर टॉर्च होताच. टॉर्चच्या प्रकाशात लांबवर दोन डोळे चमकताना दिसले. तिकडे चालत जाऊन कोणता प्राणी आहे हे पाहण्याचा जाम कंटाळा आला होता. त्यामुळे पुन्हा तलावाकडे फिरलो. पण तिथे पाणी नव्हते. तलाव पूर्ण आटला होता. साहजिकच आहे .. मार्च चे दिवस होते. आता वाघाच्या पाण्यावरुन जे पाणी आणले होते त्यावरच रात्र काढावी लागणार होती. ब्रेड जॅम लोणचे खाऊन घेतले .. आणि झोपलो. २१-२२ किमी ची पायपीट झाल्यामुळे लगेच २-३ टाळकि घोरायला लागली. घोरणे ते काय ?? अवर्णनीय असे वेग वेगळे आवाज निघत होते. ते सगळे ऐकत ऐकत मला ही झोप लागली.. सकाळी ७:३० ला मला आणि उदयला जाग आली. लगेच दुर्बिण घेऊन आम्ही मनोर्यावर चढलो. परिसर न्याहाळत असताना


उदय ने मला एक विचित्र गोष्ट दाखवली. एक सांबर निवांत झोपल्या सारखे दिसत होते. आम्ही लगेच खाली उतरलो आणि त्याच्या दिशेने चालू लागलो. पण तरीही ते हलत नव्हते मग आम्हाला जाणवले की ते मेले आहे. त्यामुळे अजुनच सावध झालो कारण जर एखाद्या प्राण्याने त्याची शिकार केली असेल तर तो आजूबाजूलाच बसला असण्यचि शक्यता आहे. सांबराचे शरीर आहे तसे होते. कोणताही भाग खाल्याचे दिसत नव्हते. आम्ही जस जसे पुढे जाऊ लागलो तसा प्रकार आमच्या लक्षात आला. हे कोणत्या वन्य प्राण्याचे नाही तर त्याच्या ही पेक्षा हिंस्त्र आणि तेवढ्याच क्षुद्र प्राण्याचे हे काम होते. आम्ही ही त्याच वंशातले होतो याची आम्हाला लाज वाटते. सांबरापाशी पोहोचल्या वर त्याच्या छाती मध्ये एक गोळी आणि मांडीवर एक गोळीची जखम दिसली. बिचार्‍याने बराच वेळ तडफडून जीव सोडल्याच्या खुणा दिसत होत्या. जीभ बाहेर आणि डोळे उघडेच होते. प्रकार पाहून खूप दुख झाले. जबरदस्त जनावर होते. ती एक पूर्ण वाढ झालेली मादी होती. त्याचे फोटो काढून आम्ही परत मनोर्‍याकडे परतलो. सगळ्यानी एक एक इरसाल शिवी त्या शिकार्‍याला दिली. आता तेवढेच आमच्या हातात होते. अभयरण्या मध्ये बघितलेला हा दुसरा प्रकार.


खिन्न मना ने समान परत बॅग मध्ये भरून आम्ही सांबर कोंडा चा रस्ता धरला. सकाळी १० ला आम्ही सांबरकोंडा ला पोहोचलो. तिथे पणि भरपुर होते. त्यामुळे मुक्काम तिथेच करायचा ठरले. मी प्रवीण आणि आशुतोष आम्ही पणि भरून आणण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागलो. तिथे एका झुडुपातून पिसोरि हरण पाळताना दिसले.
ट्रेक मधला पहिला मसाले भात तयार करण्यासाठी साहित्य बाहेर निघाले. मस्त पैकी जेवणाचा बेत उरकून सगळे झोपण्यास सज्ज झाले. मी उदय, सागर आणि प्रवीण जरा आजूबाजूच्या जंगलामध्ये फिरायला जायचे ठरवले होते. तसे आम्ही निघालो.
एका तळ्याच्या काठी आम्हाला प्राण्याचे भरपूर ठसे दिसले. तिथेच जरा शांत पणे बसायचे ठरवले. थोड्यावेळा ने समोरच्या झाडावर एक स्वर्गीय नर्तक आला. त्याचे थोडे फोटो काढून घेतले. ४ वाजता आम्ही तिथून उठलो आणि मुक्कामा च्या ठिकाणी पोहोचलो. मुक्काम तिथेच होता त्यामुळे दिवसा उजेडीच खिचडी करून घेण्याचे ठरले. पुन्हा तीच तयारी. खिचडी खाऊन घेतली. जंगलाच्या अगदी मध्ये मुक्काम असल्याकारणाने रात्रभर कोणी तरी जागे राहून पहारा देणे गरजेचे होते. त्यामुळे सगळ्याची २-२ तासाची ड्यूटी लागली. वर्ल्डकप चालू होता आणि आज इंग्लेंड आणि भारता ची मॅच होती. त्याची कॉमिंट्री थोडावेळ ऐकली व झोपी गेलो .. माझी शिफ्ट पहाटे ४ ची होती. ३-४ च्या दरम्यान एक उदमांजर खूप जोरजोरात ओरडत होते. शांततेत तो आवाज अतिशय भीषण वाटत होता. बराच वेळ ओरडत होते ते उदमांजर. माझी शिफ्ट सुरू झाली होती. मी त्याचे आवाज ऐकत ऐकत शेकोटी पाशी बसून होतो.


सकाळ झाली एक एक जण उठू लागला. ७ च्या दरम्यान एक मोठा पक्षी वारा कापत आमच्या डोक्यावरुन उडत गेला. पंखा च्या आवाजा मुळे सगळयांचे लक्ष तिकडे गेले. तो एक इंडियन पाइड हॉर्नबिल होता. दूरवर जाऊन तो एका झाडा वर बसला. थोडा वेळ त्याला न्याहाळले. पुन्हा पंखा चा भव्य विस्तार उलगडून तो सुंदर पक्षी दिसेनासा झाला .
आता जरा बसून चर्चा करून पुढचा प्लान करत होतो. २ दिवस राहिल्यावर प्राणी, पक्षी, निसर्ग पाहून बर्‍याच जणांचे मत होते की अजुन एक दिवस मुक्काम करायचा. अजुन दाट जंगलामध्ये जायचे. मला तर चार दिवस मुक्काम वाढवला असता तरी काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण एकच माणूस याचा विरोध करत होता. आम्ही सामानाची आवारा आवर करून वाघाचे पाण्याचा रस्ता धरला. सगळे जण त्या विरुद्ध पार्टीच्या माणसाला समजवण्या साठी त्याच्या मागे पुढे मागे पुढे करत होते. पण तो त्याच्या विचारावर ठाम होता. वाघाचे पाणी आले सुद्धा पण काहीही उपयोग झाला नाही. तो नाही ते नाही तयार झाला. मी त्याला काही समाजवण्याचा प्रयत्न केला नाही. वाघाच्या पाण्यावर सगळे पोहोचले. पाण्यापाशी उतरलो. माझे आधीच डोके फिरले होते त्यात समीर मला काही तरी म्हणाला. मी त्याच्यावरच चिडलो. त्याने लगेच माझ्या तोंडावर एक म्हण फेकली "वड्या चे तेल वाग्या वर काढू नकोस. "..... झाले !!!!! उदय ने लगेच आशुतोष म्हणजे ज्याच्या मुळे ग्रूप मध्ये चीड चीड झाली होती त्याला सांगितले की समीर तुला वडा म्हणत आहे. त्याच्या या वाक्या मुळे सगळीकडे हाशा पिकला. पण आशुतोष वर काहीही फरक पडला नाही आणी आम्हाला दाजीपुर चा रस्ता धरावा लागला.

यावेळी तर प्राणी दिवसा उजेडी दिसलेच नाहीत पण रात्री बरेच प्राणी दिसले.
त्याचा तपशिल नकाशा खाली देत आहे ....