-------------------------------------------------------------------------------------
***************** वासोटा किल्ल्या वरील सुंदर हनुमान मूर्ती******** कोयना आणि वासोटा ट्रेक करण्याची ही माझी ६ वि वेळ. माझी सगळ्यात आवडती जागा. नागेश्वरच्या मंदिरामध्ये बसून समोर दिसणारा तो कोकण परिसर, ती नागेश्वराची सुंदर गुहा, तिथे असणारी ती रेखीव पिंड आणी त्यावर होणारा पाण्याचा अखंड अभिषेक. डाव्या बाजूला दिसणारा उंचपुरा वासोटा किल्ला, त्याच्या मागच्या बाजूला मीच तुझ्या पेक्षा उंच असे सागणारा जुना वसोटा आणि त्याचा बाबू कडा. गुहेच्या उजव्या बाजूच्या दरी कडे गेल्यावर दिसणारी डोंगराची बाळे. तिथे तासतास बसून राहावेसे वाटते. तिथे बसल्यावर दरीमध्ये अचानक एखादे उदमांजर नजरेस पडते. गरूड उडताना दिसतो, माकडाची टोळी खाद्य शोधायला निघताना दिसते. दुरून दरीमधून निळा शैल कस्तुरची शिटी कानावर पडते. संध्याकाळी भेकराचे आवाज ऐकू येतात.कसा कंटाळा येईल हो या सगळ्या गोष्टींचा कोणाला. दरवेळी काही तरी नवीन दाखवतो हा मला. असे हे सगळे वैभव कोणाला पहावेसे वाटणार नाही. म्हणून जमेल तेंव्हा जाऊन यायचे वासोट्याला.
तसाच पुन्हा एकदा निघालो अगदी ४ वर्षे हॉस्टेलवर राहिलेला विद्यार्थी ज्या ओढीने घरी जातो त्याच ओढीने.
पुन्हा वासोट्याला जायचे या खुशीमध्ये मी सगळी तयारी केली. यावेळी सुद्धा आम्ही ४ जणच होतो. मी, उदय,सागर आणि प्रविण. मी आणि उदय आधी वासोट्याला येऊन गेलो होतो पण सागर आणि प्रविण नवीन होते.
७-६-२००३ रोजी सकाळी ९ वाजता सातार्याला पोहोचलो. राहिलेली खरेदी करून आम्ही १० च्या बामाणोलि गाडीमध्ये बसलो. बामाणोलि ला १२ ला पोहोचलो. वन आधिकार्यांची रीतसर परवानगी घेऊन आम्ही एका खाजगी लॉंच ने कुसापूरचा रस्ता धरला. २:३० च्या दरम्यान आम्ही कुसापूरच्या हद्दी मध्ये पोहोचलो. बॅग बाजूला ठेवून कपडे काढून मनसोक्त शिवसागराच्या पाण्यामध्ये डुंबलो. पाण्यामध्ये बराच वेळ पळापळ, मारामार्या करून झाल्या. मग उदयने कुठून काय कल्पना आणली. सगळ्यानी आजूबाजूला असणारी माती सर्वांगाला लावली. डुककर किंवा गवे जसे चिखलामध्ये लोळतात त्याप्रमाणे आम्ही लोळलो. चिखल वाळेपर्यंत असेच बसलो आणि मग एकमेकांची अंगे घासून आंघोळी उरकत्या घेतल्या. इतके उद्योग केल्या मुळे भुका जाम लागल्या होत्या.
एका पिम्पळाच्या झाडा खाली बसून जेवण उरकून घेतले व नागेश्वरचा रस्ता धरला. रस्त्यामध्ये एका दगडाच्या बेचकीत मला चंडोल पक्षाचे वाटी सारखे घरटे दिसले. त्यामध्ये राखी चॉकलेटी ठिपके असलेली ३ अंडी होती. सगळ्याना अंडी आणि ते सुंदर घरटे दाखवून पुढची वाट धरली. गावा मध्ये एक मुलगा भेटला. त्याला मी लगेच ओळखले. मी, उदय आणि दुष्यंत प्रथम जेंव्हा कोयना अभयारण्यामध्ये फिरायला आलो होतो तेंव्हा हा मुलगा आमचा वाटाड्या होता. त्यानेच आम्हाला यावेळी नागेश्वरची वाट दाखवली. करवदे, आळु, आंबे खातखात आमचा प्रवास चालू होता. करवदे, आळु, आंबे च्या नादा मध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि दुसर्याच रस्त्या ने चालू लागलो होतो. मग एक कारवि चे रान तुडवत मूळ रस्त्याला लागलो.
त्याच रस्त्याने पुढे एक डोंगरची चढण आहे ती चढायला सुरूवात केली. चढावर चालण्याचा खूप त्रास होत होता .. खूप दम लागत होता.
प्रवीणला तर चालणे अवघड झाले होते. बसत बसत आम्ही नागेश्वरकडे सरकत होतो. संध्याकाळच्या आत नागेश्वरला पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे पुन्हा चालायला सुरूवात केली. मी आणि उदय पुढे चालत होतो. सागर आणि प्रवीण मगेच होते. आम्हालाही खूप दम लागत होता. मजल दरमजल करत सरकायचे आम्ही ठरवले... तसेच चाललो होतो मजल दरमजल करत पण तोंडाने पण म्हणायचे मजल आणि दरमजल ही आइडिया बंडा उर्फ उदयची . मी मजल म्हणून एक पाऊल टाकायचो, तो दरमजल म्हणून एक पाऊल टाकायचा. असे करत करत आम्ही बरेच पुढे आलो. मागे यांची काहीही चाहूल लागत नव्हती.
**************************************मी स्वता:
****बंडा (वेगळीच पोज)****तरी आम्ही न थांबता पुढे चालत गेलो आणि एका टेकडीवर पोहोचलो. तिथे बसून यांची वाट पाहावी असे ठरवले होते. जवळ पाणी ही कमी होते. फक्त १ बाटली शिल्लक होती आणि त्याला सुद्धा अंबुस असा घाणेरडा वास येत होता. मला तो वाससुद्धा सहन होत नव्हता त्यामुळे पाणी पिणे दूरच. वर माथ्यावर असणार्या मन्दिरा समोरील झर्याचे पाणी पिण्याचे मी ठरवले होते. यांची वाट पाहत अर्धा तास आम्ही तिथेच बसून होतो आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो पण यांचा काही पत्ताच नाही.. समोरचे शिवसागर जलाशय आणि परिसर पाहण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही... मग एकदम आम्ही त्याना हाका मारायला सुरूवात केली. थोडा वेळाने प्रतिसाद मिळाला व ते वर चढताना दिसू लागले. मग आम्ही ही उठलो आणि एकदम मन्दिरा पाशी थांबायाचे असे ठरवून चालू लागलो. सतत आमची नजर वर किती चढन शिल्लक आहे हे पाहण्यासाठी जात होती. मंदिर टप्प्या मध्ये आले होते. तिथेच एक मोठी पांढरी वस्तू चमकताना दिसत होती. ती होती गव्याची कवटी. ती उचलून बंडाने एका खडका वर आणली. मी लगेच आजूबाजूला पाण्याचा झरा शोधण्यासाठी निघालो. पण प्रवाह पूर्ण कोरडा ठणठणीत होता. मला तिथे ही पाणी मिळाले नाही. काही वेळात हे दोघे ही येऊन पोहोचले. दोघे पूर्णपणे आडवे झाले.प्रवीणला चालण्याचा खूप त्रास होत होता. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हा पुढचा टप्पा पूर्णपणे गर्द झाडीमधून होता आणि जास्त चढ सुद्धा नव्हता. मी माझ्या मागे उदय, सागर आणि शेवटी प्रवीण असे आम्ही चालत होतो. मला या वाटेची पूर्ण माहिती असल्याने मी सगळ्यात पुढे असायचो. प्रवीण ने मला कप्तान पदवी बहाल केली होती. संध्याकाळी ६ ला आम्ही झाडीच्या टोकाला येऊन पोहोचलो .. समोर एक विस्तीर्ण पठार आहे त्यावर संध्याकाळी गवे चरायला आले असण्याची शक्यता होती.
*************गवा (शिंग मोडलेला)त्यामुळे सगळ्याना शांत चालण्याची सूचना करून पुढे चालू लागलो. झाडीच्या समोरच एक गवा चारताना दिसला. तो एक भला मोठा नर होता. मी सगळ्याना खाली बसण्याचा इशारा केला आणीं कॅमेरा सज्ज केला. आजूबाजूला ३ गवे आणि एक पिल्लू चारताना दिसले. सगळ्याना गवे दाखवले व त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरकलो. पण लेन्सवर सूर्यकिरण येत होते त्यामुळे थोडा उजवीकडे जाऊन फोटो काढायचे ठरवले व शांतपणे सरकू लागलो. तेवढ्यात माझ्या पायाखाली काटकी मोडली व गवे सावध होऊन आवाजाच्या दिशेला पाहु लागले. मी लगेच फोटो काढला. कॅमेराचा आवाज ऐकून सगळे पळू लागले. मी झाडीतून बाहेर आलो आणि फोटो घेऊ लागलो. सगळे गवे झाडीमध्ये पळुन गेले पण नर तसाच थांबून माझ्याकडे पाहत होता. मी पण त्याच्याकडे सरकू लागलो. या गव्याचे उजवे शिंग वळून खाली कानापाशी आले होते. त्याचा फोटो घेतला .. तो सुद्धा पळत झाडी मध्ये अदृश्य झाला..
गव्यांच्या दर्शनाने ४ तहानलेले जीव ताजेतवाने झाले होते. ६:१५ झाले होते. समोर नागेश्वरचा सुळका दिसू लागला. पायाना पण वेग आला होता. आजूबाजूचे डोंगर दर्या पाहून प्रवीण आणि सागर चक्रावून गेले. बराच वेळ ते एकडे तिकडे बघत बसले. दरीचे फोटो घेऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. डावी कडे दरी मध्ये २-३ गवे चारताना दिसले. थोड्याच वेळामध्ये आम्ही
*********************नागेश्वर मंदिर*********************** 
नागेश्वरला पोहोचलो. आता तहानलेल्या घश्यानी डोके वर काढले होते. भरपूर पाणी प्यावे असे सगळ्यानाच वाटत होते. कुंडाकडे जाण्याआधी बाटली मध्ये जे पाणी होते ते सुद्धा फेकून बाटली स्वच्छ धुवून घेतली. मसालेभात करण्यासाठी लागणारे सगळे समान काढून आम्ही कुंडाचा रस्ता धरला. कधी तिथे पोहचतो आणि भरपुर पाणी पितो असे झाले होते. कुंडावर पोहोचलो आणि टॉर्चचा प्रकाश कुंडा मध्ये टाकला. डोक्याला हात लावण्याची वेळ आली. कुंडा मध्ये थेंबभर सुद्धा पाणी नव्हते.
माझे आधीच कोरडे पडलेले तोंड अजुन कोरडे झाले. रात्री जेवण नाही, पाणी नाही तसेच झोपावे लागणार होते. आता जवळपास पाणी मिळणे अशक्य . आता पाणी फक्त वासोटा किल्ल्यावरच त्यामुळे रात्रीच किल्ल्यावर जायचा विचार मनात येऊ लागला. पण प्राणी आणि इतर श्वपदांचे भय होतेच की. त्यामुळे तो विचार मनातून काढून टाकला आणि गुहे कडे परतलो.
नागेश्वराच्या गुहेमध्ये छतातून १२ महिने १८ काळ पाणी ठिपकत असते. त्याच्या ठिबकण्याने तिथे ठेवलेला तांब्या भरला होता. तांब्या कसला गडू होता. सगळ्यानी त्यामधील घोट घोट पाणी प्यायले. गुहेत चढताना पायार्याच्या उजव्या बाजूला असाच एक छोटासा खळगा आहे तिथे ही पाणी असण्याची शक्यता होती. तिथे ही घोट भर पाणी होते. पण ते पीणार कसे . एक कल्पना सुचली. एक पेन घेतल त्याची रिफील,टोपण काढून त्याचा स्ट्रो तयार केला आणि त्या घोटभर पाण्याचा चुसका मारला व तो खडडा अजुन खोल आणि साफ करून ठेवला जेणे करून जास्त पाणी साठेल.
रात्री बरोबर आणलेल्या तिखट पुर्या आणि गुळ असे काहीसे विचित्र जेवण करून घेतले. उदय आणि सागरने तर भरपुर कांदा खाल्ला. बिछने पसरून आम्ही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण छे !!! मला आणि उदयला आजिबात झोप लागत नव्हती. सागर आणि प्रवीण मस्त पैकी डाराडुर. आमचा ही थोड्या वेळा ने डोळा लागल्या सारखा झाला. पण मध्या रात्री पुन्हा जाग आली. तोंड पूर्ण कोरडे पडले होते. खाळग्यामध्ये पाणी साठले आहे का पाहण्यासाठी उठलो. बंडा पण होतच जागा. तो सुद्धा आला. मी तर स्ट्रो घेउनच होतो. पण त्या खाळग्यावर जे जीव रोज पाणी पितात त्यातील एक जीव तिथे बसून आधीच जिभल्या चाटात होता. ती होती एक भली मोठी पाल. तिचे पाणी पिऊन झाले होते आता ती तिच्या मोठ्या जिभे ने डोळे, ओठ नाक साफ करत बसली होती. तो प्रकार पाहून बंडा पाणी पिण्यास तयार होईना. पण मी पुन्हा एकदा चुसका मारला आणि सकाळ ची वाट बघत बिछान्या वर पडलो. रात्री थोडा डोळा लागला की लगेच पाण्या ची स्वप्ने पडत होती. आई मला तांब्याभर थंडगार पाणी देत आहे असे स्वप्न मला सारखे पडत होते. पण हे दोघे गाढ झोपले. मला पाण्याची स्वप्ने आणि सागर काय माहीत कसली स्वप्ने पडत होती, तो मोठमोठ्याने ओरडत आणि शिव्या देत होता. माझे तर हसून ह्सून पोट दुखण्याची वेळ आली होती. बंडा म्हणाला तो तुलाच शिव्या देत आहे इकडे आणल्या बद्दल. आम्ही पण त्याला उठवत नव्हतो. त्याचा आरडाओरड ऐकायला मज्जा येत होती. सकाळी कळले की त्याला झोपेमध्ये चावळण्याची सवय आहे.
सकाळी ज्यानी पाण्यामध्ये उच्छाद मंडला होता रात्री त्यांच्यावर अशी वेळ येईल असे वाटले ही नव्हते.
************************************सकाळी धुके नागेश्वर मंदिरामधून***************
सकाळी लवकर उठून वासोटा गाठायचा ठरले होते. पण लवकर उठून ही काहीही उपयोग झाला नाही. जाम धुके पडले होते. आमच्या चादरी ओल्या झाल्या होत्या. समोर निळा शैल कस्तुर शिळ घालत होता. धुके पाहत बसण्याची अजिबात इच्छा नव्हती. ७ ला थोडे धुके कमी झाले आणि आम्ही वासोट्याच्या दिशेला चालू लागलो. काल दुपार पासून तहानलेलो होतो. वासोट्याला पाणी नक्की मिळणार त्यामुळे पाऊले झपझप पडत होती. तोंड पुन्हा कोरडे पडू लागले. झाडाझुडपाच्या पानावरचे पाणी चाटुन तोंड थोडे फार ओले करण्याचा प्रयत्न चालू होता. काळ पासून चालून चालून शरीरातून पूर्ण घाम निघाला होता त्या बरोबर क्षर निघत होते. अंगावर मिठासारखा थर जमा झाला होता.
गर्द झाडीतून प्रवास चालू होता. भरपुर चालणे झाले होते पण आता घाम येणे बंद झाले होते. या वर्षी नागेश्वर ते वसोटा मार्गावर सगळ्यात जास्त विसावे पडले होते . खजूर खात, गोळ्या खात आमचा प्रवास चालू होता.
माझे लक्ष्य मात्र काही दिसते का या कडे होते. झाडा चे शेंडे,बुंधे, दगड, झाडाच्या ढोली, सगळे निरखून पाहत मी चाललो होतो. वाटेत बरेच पक्षी दिसले. पण कोणीही काहीही पाहण्याच्या मनस्थीती मध्ये नव्हते. पलपचोळ्या मध्ये मला एक मस्त बेडूक दिसला त्याचे फोटो काढून आम्ही पुढे झालो.
प्रवीणला आता आजिबात चालण्याची शक्ति राहिली नव्हती. कालपासून आम्ही १०-१५ किलोचे समान पाठीवर घेऊन बिना पाण्याचे चालत होतो. त्याचाच परिणाम होता हा. प्रवीण बसेल तिथे आडवा होत होता. आम्ही वासोट्याच्या अगदी पायथ्याला होतो. आता खरा चढ चढायचा होता. त्याला कसे घेऊन जायचे याचा विचार करत होतो . मग मी आणि उदय वर जाऊन पाणी घेऊन यावे असा आग्रह त्याने धरला. तुम्ही हळू हळू वर चालत या, मी आणि उदय जाऊन तो पर्यंत पाणी घेऊन येतो असे सांगून मी आणि उदय गडाकडे निघालो.
आणि गडावर पण पाणी नसेल तर ????? हा विचार येऊन पोटात गोळच आला. मग काय करायचे हे सुद्धा ठरले होते.तिथून सरळ उठून शिव सागर जलाशयाकडे चालत जायचे.. त्यामुळे चालण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप दम लागत होता. पुन्हा तेच मजल दरमजल म्हणत म्हणत वर चढलो. पाण्याच्या टाकीकडे कूच केले. दोन्हीही टाक्यामध्ये पाणी भरपुर होते.नुसते पाणी बघून पाणी पिण्यपेक्षा ही जास्त आनंद झाला.
***********वासोट्या वरील स्वच्छ सुंदर पाणी.. हा!! हा!! हा!!**************बाटली भर पाणी काढले आणि भरपूर पाणी पिऊन घेतले. डोके शांत झाले, पोट शांत झाले, शरीर शांत झाले. तहान लागण्याचा आणि पाण्याचा शरीरसाठीच्या उपयोगाचा तो परमोच्च बिंदू होता. पाणी मिळण्याआधीचे शरीर आणि पाणी पिल्या नंतरचे शरीर या मधील फरक लगेच जाणवत होता. आत्तापर्यंत अजिबात घाम येत नव्हता पण पाणी पोटात गेल्या वर घामाच्या धारा सुरू झाल्या. शरिराने स्वता: रोखून धरलेला पाण्याचा प्रवाह आपोआप सुरू झाला. शरीर गार झाले आणि आत्मा थंड झाला. आमचे तर शरीर शांत झाले होते आता त्यांची आठवण झाली.
त्या दोघा ना बोलावाण्या साठी मी दरी च्या टोका वर गेलो. दोघे ही जवळच पोहोचले होते. पाणी भरपुर आहे असे सांगितल्यावर त्यांचाही चालण्याचा वेग वाढला. मी एका बाटलीमध्ये पाणी साखर आणि मिठचे मिश्रण तयार केले. ते पिल्यावर तर अजुनच बरे वाटू लागले. सागर आणि प्रवीणला तेच पाणी प्यायला दिले. थोडा वेळ शांतपणे बसल्यावर प्रवीणला बरे वाटू लागले .. हुरूप आला. काल पासून जेवण ही नीट झाले नव्हते त्यामुळे मसालेभात करण्यासाठी तयारी केली. आता काय पाणी मिळाले होते आणि पोटात ही गेले होते त्यामुळे इकडे तिकडे फिरून जरा निरीक्षण केले. तळ्यकाठी गव्याचे भरपुर ठसे दिसले.
मसालेभात तासाभरात तयार झाला. जेवण चालू असतानाच एक ग्रूप तिथे आला. भात खात खातच पुढचे प्लॅनिंग झाले होते. जेवणानंतर गड फिरायचा ठरले. जेवण झाल्यावर सामान एका झुडुपात लपवून आम्ही बाबूकड्याच्या वाटेला लागलो. रस्त्यामध्ये बर्याचवेळा निलगिरी वुड पिजन दिसले. काही वेळात त्या विशाल बाबूकड्या वर पोहोचलो. पाताळात घुसलेली दरी पाहिली की तिथून पॅराग्लाइडिंगच करत जावेसे वाटते. समोरच्या कातळामध्ये काय असेल, तिथे कोणते प्राणी पक्षी असतील. ते आपल्याला कधी पाहायला मिळतील का असे प्रश्न मला पडतात.. समोर जुना वासोटा उभा होता.तिथे कधी तरी जायचे. एक मुक्काम तिथे करायचा असे मी मनाशीच ठरवले आहे. त्याच दिवसाची वाट पाहत आहे मी. तिथे फोटो सेशन झाले आणि आम्ही परत फिरलो. समान उचलून महादेवाच्या मंदिराची वाट धरली.
थोडा वेळ विश्रांती घ्यावी यावर सगळ्याचे एक मत झाले व चटया बाहेर निघाल्या. पडून अर्धाच तास झाला असेल तोच एक पुण्याचा ग्रूप येऊन पोहोचला. त्यानी पाण्यामध्ये टाकायचे औषध मागितले. त्यांचा सुद्धा आज तिथेच मुक्काम पडणार होता. ४ वाजता आम्ही पुन्हा गड फिरायचे ठरवले. समान आवरून आम्ही मारुती मंदिराचा रस्ता धरला. माझा आणि अस्वलाचा झालेला आमना सामना मी कृतीने करून दाखविला. हे सगळे ऐकून झाल्यावर सागर आणि उदयने आड वाटेने ताई तेलिणिच्या वाड्यात प्रवेश केला. मी सुद्धा त्यांच्या मागे निघालो . माझी नजर इकडे तिकडे भीरभिरत होती. तेवढ्यात नजर एका
************************चापडा.*************************
********************चापडा.********************
******************विषदन्त***************वेटोळ्यावर जाऊन थांबली. तो एक बांबू पीट वाइपर होता. उंच झाडावर शांतपणे बसला होता. लॉंच मध्येच उदय ला मी, मला साप दिसावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानेपण माझ्या पाठीवर थाप मारुन दिसणारच साप असा होकार भरला होता आणि माझ्याच मुळे दिसणार असेही म्हणाला.. त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली साप पण दिसला आणि त्याच्या मुळेच दिसला कारण ते जर आडवाटेने गेले नसते तर मी कशाला गेलो असतो तीकडून आणि मग ते वेटोळे मला कसे दिसले असते. सगळ्याना बोलावून ते झाड दाखवले आणि म्हणालो की या झाडावर एक साप आहे शोधून दाखवा. कोणाला ही तो साप सापडला नाही असा तो मिसळुन गेला होता आजूबाजूच्या रंगामध्ये. त्याचे आहे त्या पोज़ मध्ये फोटो काढून त्याला एका काठीवर घेतले. तिथे त्याचे फोटो काढून त्याला सोडून दिले. तिथून आम्ही नागेश्वराच्या बाजूला असणार्या माची वर जाऊन बसलो.
************तुळशी वृंदावन**********आजूबाजूला गडाच्या कड्यावर सगळीकडे उदमांजराची विष्ठा दिसत होती.
माची वा बसून रात्री खाली दरी मध्ये काही दिसते का हे बघणार होतो. त्याप्रमाणे माची वर स्थानापन्न झालो. ७ वाजले होते. समोर सूर्य नारायण दिवसभरा चे काम संपवून मावळतीला निघाला होता. ते सुंदर दृष्य बघत ओळीने त्या माचीवर बसलो. समोर कारविच्या झाडीमध्ये विसलिंग थ्रश मस्त शिटी मारत बसला होता. खाली एका छोट्याशा मोकळ्या जागे मध्ये एक प्राणी चारताना सागरला दिसला. तो गवा होता.बराच वेळ बसून होतो. ८ वाजत आले होते. आम्ही उठलो आणि मन्दिराकडे जायला निघालो. जंगलामधून घुबडांचा आवाज येत होता. मध्येच एखादा रातावा ही ओरडत होता.
**************चहा तयार झाला.************************ 
पुण्याहून आलेल्या ग्रूपने मन्दिरा बाहेर पथार्या टाकल्या. आम्ही ४ जण आणि त्यांच्यातील २ लहान मेंबर मन्दिरामध्ये झोपणार होतो. गप्पा मारत मारत मसालेभात संपवला आणि झोपण्यासाठी आत गेलो. रात्री चे १०-१०:३० झाले असतील. मस्त झोप लागली होती पण दोन एक तासात एकदम गडबड सुरू झाली. उठून बघतो तर बाहेर पाऊस पडू लागला होता त्यामुळे बाहेर झोपलेले सगळे जण आत मध्ये आले होते. त्या ४ बाय १४ च्या मन्दिरामध्ये १३ जण बसलो होतो. झोपणे तर दूरच पण नीट बसता ही येत नव्हते. गाभारा रिकामा होता पण जिकडे तिकडे मोठ मोठी बिळे आणि कपार्या असल्या मुळे आत कोण जात नव्हते. इथे वाकडे तिकडे बसून रहाण्यापेक्षा आत मध्ये नीट झोपता येईल असा विचार करून मी चादर घेऊन सरळ आत गेलो. टॉर्चने सगळी कडे नीट पाहून घेतले आणि तिथे झोपी गेलो. सकाळी ७ ला जाग आली, चहा नाश्ता झाला. आज आम्ही खाली जंगलामध्ये जाणार होतो आणि तो ग्रूप चोरवणे मार्गे खाली कोकणात उतरणार होता. फोन नंबरची देवाणघेवाण करून आम्ही निरोप घेतला. रस्ता सोडून अतिशय अवघड आणि दाट झाडीतून चालू लागलो. सगळे जण एकएकदा आपटले सुद्धा. नुसता काळोख आणि किरर्रर शांतता होती. ओढ्याचे प्रवाह, पडलेले मोठ मोठे ओन्डके पार करत करत आमचा प्रवास चालू होता. मध्येच एखादे मोठे बिळ किंवा गुहा दिसायाची टॉर्च बरोबर होतीच. मग सावधपणे आत डोकवून बघायचे. आजूबाजूला पडलेली हाडे, साळीदरचे काटे निरखायचे, काही ठिकाणी सडलेल्या मटणासारखा वास यायचा. अशा गुहा साळीदरच्या असु शकतात. पुढे एक विशाल पिम्पळ वर्गीय झाड दिसले. ते विशाल झाड पाहून खूप मस्त वाटले.
असे झाड वाढण्यासाठी १००-१५० वर्षा चा काळ लागतो पण माणूस २ मिनिटा मध्ये त्याला जमीनदोस्त करतो.
प्राणी, साप यांच्या बाबता ही मला तेच वाटते. एक एक वर्षे पूर्ण करण्यासाठी त्याना किती नैसर्गिक व अनैसर्गिक सन्कटाना सामोरे जावे लागते. आणि काठी किंवा कुर्हाडीच्या एका फटक्यात माणूस त्यांचे हे सगळे कष्ट,प्रयत्न वाया घालवतो, त्यांचे जीवन संपावतो. विचित्र आणि क्रूर पणा ची हद्द असते ती आणि परत एका फटक्यात माराल्याची घाणेरडी मीजास. असह्य आहे असे पहाणे.
******************सागर. ***************झाडा वर मधामश्यांची भरपूर पोळी होती. झाडाचे फोटो काढून आम्ही पुढचा रस्ता धरला. चालत चालत आम्ही एका नाल्याला येऊन मिळलो. हाच तो नाला नागेश्वरा कडून शिवसागर जलाशयाकडे जातो. आम्ही नागेश्वराच्या दिशेने चालू लागलो. वाटेत भरपूर फुलपाखरे दिसली त्यामध्ये कॉमन क्रो, ब्लू मॉर्मोन, स्ट्राइप्ड टाइगर,ग्लोसी टाइगर,कॉमन गल इत्यादी होती.
काहीवेळा ने डाव्या बाजूला झाडावरुन खाली उतरून काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्यादिशेला झाडी मध्ये शिरलो, फक्त पानांचा आवाज येत होता पण काहीही दिसत नव्हते. तसेच सगळ्याना आत येण्यास सांगून झाडीमधूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत भरपूर शेकरू दिसले. आम्ही परतीच्या वाटेवर होतो. ३ वाजले असतील . अजुन बराच वेळ असल्याकारणाने आम्ही एका ठिकाणी बसून काही दिसते का ते पाहणार होतो. एक जागा निवडून स्थानापन्न झालो ... जंगलाच्या मध्येच अगदी मोठे दगड होते आणि आजूबाजूचा परिसर जास्त दाट ही नव्हता. त्यामुळे तिथे काही तरी दिसण्यची शक्यता आहे असे वाटून आम्ही तिथे बसलो. पण बराच वेळ बसून ही काही हालचाल नाही . अजुन किती चालायचे आहे गडावर पोहोचण्यासाठी हे ही माहीत नव्हते. त्यामुळे उठून गडाचा रस्ता धरला. ५ ला पोहोचलो सुद्धा गडावर. पुन्हा भात शिजवायला घेतला. बाकीचे भात करत बसले आणि मी एक लपण करण्यत गुंतलो होतो. तळ्याच्या बाजूलाच जरा दूरवर झुडूपाचा आडोसा घेऊन लपण तयार केले. रात्री तिथे बसण्याचा इरादा होता. कारण सकळि गड उतरताना गडावरुन खाली जाणार्या बिबट्यचे ठसे दिसले होते. तो पुन्हा जर पाण्यावर आला आणि आमचे नशीब असेल तर दिसेल. अशी एक अटकळ मनात बाळगून आडोसा तयार करत होतो. आडोसा छान तयार झाला होता.
**********************खिचडी ची तयारी.********************
****************खिचडी चा मस्त तवन्ग.****************भात खाऊन पुन्हा गडावर साप शोध मोहिम हाती घ्यायची होती. भात खाऊन प्रथम काल दिसलेल्या चापड्यापाशी गेलो. पण तिथे काहीही नव्हते आणि सगळा गड पालथा घातला पण एका पिसोरी हरणाशिवाय काहीही दिसले नाही. पुन्हा मन्दिरापाशी
आलो. अंधार पडू लागला. भात खाऊन गप्पा मारत मन्दिरासमोर बसलो होतो. सगळे कंटाळले होते त्यामुळे रात्री तळयावर जाऊन बसायचा प्रोग्रॅम रद्द झाला आणि तिथेच गप्पा मारत बसावे असे ठरले. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या. मला दरीतून सारखा काहीतरी आवाज येत होता पण काही प्राणी असला तरी काय उपयोग, दिसणार तर नाहीच असे समजून आम्ही नुसते आवाज ऐकत होतो. पण शेवटी न राहवून मी उठलो आणि टॉर्च ने खाली शोधू लागलो. दरी न्याहाळत असताना झाडावर २ डोळे चमकले. डोळ्या मागे कळसर भाग दिसला. जरा बाजूला सरकून मी त्याच्या सरळ रेषेत आलो. आता चित्र जरा स्पष्ट झाले .. ते एक टोडि कॅट म्हणजे मसण्या उद होते. झाडा वर एकडे तिकडे भक्ष शोधत फिरत होते. मधूनच ते आजूबाजूला बघत होते. एकदम आमच्या कडे बघितल्यावर त्याचे डोळे हेड लाइट सारखे चमकायचे. थोडावेळ त्याच्याकडे पाहून त्याला त्याचे काम करू देण्यासाठी टॉर्च बंद केला. पण काही वेळात त्या झाडा वरुन बराच जोरजोरात पळण्याचा आणि काटक्या मोडल्याचा आवाज आला. म्हणून पटकन त्या झाडावर प्रकाश टाकला. तिथे अजुन एक प्राणी दिसला ते ब्राउन पाम सिवेट (तपकिरी उद मांजर ) होते. ते मसण्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते.
मसण्या तपकिरी उद मांजरा कडे लक्ष ठेवून गड चढू लागले. आमच्या अगदी समोरूनच ते गड चढत होते. थोड्याच वेळात ते गड चढून आमच्या समोर आले आणि छोटासा गुरूगुरटा सारखा आवाज काढून पळत दुसर्या बाजूच्या काड्यावरुन खाली उतरून गेले.. आम्ही त्याच्या मागे पळालो पण ५ सेकंदा मध्ये ते दिसेनासे ही झाले होते. परत ब्राउन पाम सिवेट पाशी आलो. ते अजुन खालीच काही तरी खात बसले होते.
सागर व प्रवीण झोपण्यासाठी मंदिराकडे गेले. मी आणि उदय त्या सिवेटला न्याहाळत बसलो होतो. ते उदमांजर ही आता वर चढू लागले. ते वर चढून माझ्या अगदी समोर ४-५ फूटावर येऊन बसले. मी त्याच्यावर टॉर्चचा झोत धरला होता. त्याला त्यामुळे काही दिसत नव्हते पण प्रकाशाच्या मागे काही तरी आहे याची जणिव होती. अगदी सावधपणे ते आपले काम करत होते. पाय चाट, कुठे कान खाजव असे उद्योग चालू होते... हे जंगली जनावर माझ्यासमोर अगदी ५ फुटावर बसून हे सगळे करत होते माझा तर विश्वासच बसत नव्हता. थोडावेळा ने साहेबानी आमच्या समोर शी केली आणि पुन्हा खाली उतरू लागले .. जवळ जवळ २-३ मिनिटे ते आमच्या समोर बसले होते. उतरताना सारखे मागे वळून बघत होते. मी त्याला पूर्ण खाली जाई पर्यंत न्याहळत होतो. ते पुन्हा त्याच झाडा वर चढले आणि खाद्य शोधण्यात गुंग झाले. त्याने केलेल्या शी मध्ये बर्याच प्रकारच्या बिया होत्या.
सगळी कडे धुके दाटू लागले होते, नाइलाजाने मला उठून मंदिराचा रस्ता धरावा लागला. अन्थरुणावर पडून ही त्या उदमांजरचे चित्र डोळ्या समोरून जात नव्हते. वाईट इतकेच वाटते की त्याला मी कॅमरा मध्ये बंद करू शकलो नाही.
दुसर्या दिवशी आम्ही नागेश्वर वरुन खाली चोरवणे गावात उतरून घरी जाणार होतो. निघण्यापुर्वी मारुती मंदिर आणि महादेव मंदिर साफ करण्या चे ठरवले होते. सकाळी उठून नाश्ता करून महादेव मंदिर साफ करण्याचे काम हाती घेतले.
मंदिरासमोर व वर उगवलेली सगळी झाडे काढली. त्यांच्या मुळावर रॉकेल उतून ते पेटवून दिले. झाडाच्या फांद्यानी मंदिराचा परिसर स्वच्छ झाडून घेतला. कडेला विखुरलेली दगडी व्यवस्थित रचली. गाभार्यातील कचरा साफ केला. शिवलिंग स्वच्छ धुवून घेतले.. समोर निराजन लावले.. नुसत्या त्या निरंजनाने परिसरात एक वेगळेच चैतन्य जाणवू लागले. महादेवचरणी मस्तक टेकवून आम्ही आमचा मोर्चा मारुती मंदिराकडे वळविला.
गाभार्या तील सगळा पालापाचोळा काढून बाहेर भिरकावला. प्रवीण तर कलाकुसरच करत बसला तिथे. आजूबाजूचे दगड एकत्र करून त्याने मंदिरामध्ये जाणारा रस्ता बाजूला असलेला चौथारा सजवला. मंदिराच्या भिंतीवर उगवलेले शेवाळे काढले. मग मारुतीला ही पाण्याचा आभिषेक झाला. दम लागला पण समाधान ही वाटत होते. थोडीशी घोषणा बाजी झाली आणि आम्ही सामानाची आवारा आवर करायला महादेव मंदिरापाशी आलो. समान तसेच उचलून तळे गाठले. हातपाय धुवून जरा तिथेच विसावलो. उदयाला जुन्या वासोट्या वरुन २ मोठे पक्षी उडत येताना दिसले, ते ग्रेट पाइड हॉर्नबिल होते. पंखाचा मोठा आवाज करत ते रेडे घाटामध्ये उतरले. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून नागेश्वरचा रस्ता धरला. आता जवळ पाणी भरपुर होते. घड्याळ २ वाजल्या चे दाखवत होते. एकदम तुळशी वृंदावन पाशी थांबायाचे ठरवून आम्ही चालू लागलो. झाडीमध्ये शिरताच आमच्या उजव्या बाजूला काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्या दिशेला पळालो. एक मोठा पूर्ण वाढ झालेला सांबर नर होता. त्याच्या मागे २ माद्या सुद्धा दिसल्या. झाडीमध्ये बरेच शेकरू,वानरे, माकडे दिसली. दीड तासामध्ये नागेश्वर गाठले. पिशव्या तिथेच खाली ठेऊन वर गुहे मध्ये गेलो. २ दिवसा पुर्वी आमची हालत खूप बेकार झाली होती.. इथेच तो मुक्काम होता . आम्हाला तेच तेच आठवत होते. कसा कोणाला त्रास झाला. कोण कसे वागत होते.या पुढे काय करायचे यावर एक परिसांवादच सुरू झाला.
हे सगळे चालू असताना बाहेर ऋतू बदलला. मस्त उन्ह पडलेले होते आता त्यांची जागा काळ्या ढगानि घेतली. सुसट्याचा वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. मोराला आनद व्हावा तसा आम्हाला आनंद झाला. माझे मयूर नृत्य सगळ्यानी मस्त एन्जॉय केले. तिथे असणारा खराटा पीसार्या सारखा मागे धरून सैरा वैरा धावलो होतो मी. मस्त मज्जा आली. हसून हसून पार पोटाचा भुगा झाला... पाऊस थांबला नागेश्वरच्या पाया पडून आम्ही खाली उतरू लागलो.
********************नागेश्वर च्या वाटे वरून वासोटा. ***************** थोडे खाली उतरल्यावर दुर्बिण गुहेत राहिल्याचे लक्षात आले. सागर आणि प्रवीण परत वर गेले आणि दुर्बिण घेऊन आले. उतरताना पाय लटलट कपू लागले. बरेच खाली उतरलो . ७ वाजले असतील. बंडाला गुडघ्याचा त्रास जाणवू लागला. त्याला समान घेऊन चालणे शक्य होत नव्हते. त्याचे काही समान सागरने घेतले व चालणे सुरू केले. गाव जवळ आले पण आम्ही रस्ता चुकलो. गावातील दिव्याच्या दिशेने चालायचे ठरवून आम्ही चालू लागलो . पण गाव काही लवकर येईना. आम्ही रस्ता चुकलो आहे हे गावातील एका माणसाला कळले. त्याने लांबूनच रस्ता सांगितला आणि आम्ही रस्त्याला लागलो. आजूबाजूला लाखो काजवे झाडावर गर्दी करून बसले होते. झाडावर रोषणाई केल्या सारखे ते दिसत होते. ते दृश्य बघत आम्ही गाव गाठले. एका वृद्ध माणसाने आम्हाला घरी नेले. पाणी आणि साखर पुढयात देऊन त्याने त्याचा आग्रह केला. त्याला ही माहीत होते की जास्त परिश्रम झाल्यावर गोड काहीतरी शरीरात जाणे जरुरीचे असते.. आम्ही ते खाऊन त्यांचा निरोप घेतला आणि मंदिर गाठले.
मंदिरामध्ये पोहोचल्या वर हातपंपा खाली मस्त पैकी आंघोळी करून घेतल्या ३ दिवसानि आंघोळी करत होतो. अंग मोकळे मोकळे वाटू लागले. ताजेतवाने झालो. मग जेवणचि तयारी सुरू केली. गावातील एका व्यक्तीने स्टॉव्ह आणून दिला त्यामुळे भात शिजवायला जास्त त्रास झाला नाही. ११:०० ला जेवण झाले आणि आम्ही झोपायला मांदिरामध्ये गेलो.
मंदिर अतिशय सुंदर होते. नवीन बांधणीचे होते, पण कलाकुसर चांगली होती, जागा ही प्रशस्त होती. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले दिसले. मंदिरासमोर एक मोठे पिम्पळाचे झाड आहे. सकाळी त्या झाडावर भरपूर पक्षी येतात. एकदा तर मला त्या झाडावर सकाळी सकाळी एक घोरपडी चे पिल्लू ही दिसले होते.
रात्री पुन्हा एकदा सागर झोपे मध्ये ओरडु लागला. शिव्या पण देत होता. पहिल्या दिवशी आम्ही जंगलामध्ये होतो. तिथे हे सगळे शब्द, वाक्यप्रचार ऐकायला कोणीही नव्हते. पण इथे आम्ही आता गावामध्ये होतो. त्याला जरा उठवून शांत झोपायला सांगितले. मी ही मग आडवा झालो.
सकाळी उठून तोंड धुवून घेतले, बाकी तिघे जण प्रत:विधी साठी गेले असताना मंदिरापाशी एक वृद्ध गावकरी आले. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. पुर्वी कसा पाऊस पडायचा आता काय बदल झाले आहेत हे ते सांगत होते.
बोलता बोलता त्याने पुढे सांगायला सुरूवात केली. ते ऐकून काहीतरी वेगळेच वाटू लागले. ते गृहस्थ सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेने मध्ये शिपाई होते. ते टोकियोला ही जाऊन आल्याचे ते सांगत होते. मी तल्लीन होऊन त्याच्या गोष्टी ऐकत बसलो. पानसुपारी खाऊन ते घराकडे निघून गेले. झालेली घटना मी पोराना सांगितली. सगळेच म्हणाले मुर्खा फोटो का काढला नाहीस त्यांचा. खरे तर मला काहीच सुचले नव्हते त्यावेळी.
समान आवरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
चोरवणे-चिपळुन-महाड-भोर असा प्रवास करून आम्ही घरी पोहोचलो. वरंध घाटामध्ये २ कोल्हे, साप असे प्राणी ही दिसले.
भरपुर भूक लागली होतो. पण भोर पूर्ण बंद झाले होते. रूमवर जाऊन झोपण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता.
उपाशीच झोपलो.
या ट्रेक मध्ये पाण्यावीना झालेली आमची अवस्था न विसरण्या सारखी होती.

